(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Mega Auction 2025: 1500 विकेट्स घेणाऱ्या दिग्गज गोलंदाजाचा अपमान; आयपीएलच्या मेगा लिलावात नावही घेतलं नाही!
IPL Mega Auction 2025: लिलावात एकूण 182 खेळाडूंची विक्री झाली. मात्र, लिलावात अनेक मोठे खेळाडू होते ज्यांना कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.
IPL Mega Auction 2025: आयपीएल 2025 च्या हंगामाचा मेगा लिलाव (IPL Mega Auction 2025) झाला आहे. आता सर्व संघ आयपीएलच्या 18 व्या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. या लिलावात एकूण 182 खेळाडूंची विक्री झाली. मात्र, लिलावात अनेक मोठे खेळाडू होते ज्यांना कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.
कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट घेणारा 42 वर्षीय जेम्स अँडरसनने (James Anderson) आयपीएल 2025 च्या लिलावात आपले नाव दिले होते. या अनुभवी वेगवान गोलंदाजाला कोण खरेदी करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, चाहते लिलावाच्या दोन्ही दिवसांची वाट पाहत राहिले. लिलावात अँडरसनचे नाव घेण्यात आले नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की अँडरसनमध्ये कोणत्याही संघाने रस दाखवला नाही.
आयपीएल लिलावात जेम्स अँडरसनकडे दुर्लक्ष-
अँडरसनने आयपीएलसाठी त्याची मूळ किंमत 1.25 कोटी रुपये ठेवली होती. त्याच्या कारकिर्दीत तो यापूर्वी कधीही आयपीएल खेळला नव्हता. अगदी 10 वर्षांपूर्वी त्याने कारकिर्दीतील शेवटचा टी-20 सामना खेळला होता. अँडरसन गेली अनेक वर्षे इंग्लंडकडून फक्त कसोटी क्रिकेट खेळत होता. जुलै 2024 मध्ये लॉर्ड्स येथे वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटचा सामना खेळून त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट केला. आता त्याने जगभरातील T20 लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र आयपीएल लिलावात त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
जेम्स अँडरसन काय म्हणाला होता?
जेम्स अँडरसनने खुद्द खुलासा केला होता की, तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खूप उत्सुक आहे. बीबीसी रेडिओशी बोलताना तो म्हणाला, मला वाटते की मला अजूनही खेळाची आवड आहे. मी कधीही आयपीएलमध्ये खेळलो नाही आणि मला वाटते की एक खेळाडू म्हणून मला अजूनही खूप काही करायचे आहे.
जेम्स अँडरसनच्या नावावर 1500 हून अधिक विकेट्स-
जेम्स अँडरसनच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 704 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 269 विकेट्स आहेत. त्याचबरोबर त्याने पहिल्या क्रिकेटमध्ये 1126 विकेट्स, लिस्ट A मध्ये 358 विकेट्स आणि T20 मध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत. अशाप्रकारे त्याच्या नावावर 1500 हून अधिक विकेट्स आहेत.
ऋषभ पंत ठरला सर्वात महागडा खेळाडू-
लिलावातील पहिल्या पाच सर्वात महागड्या खेळाडूंवर नजर टाकल्यास ऋषभ पंत पहिल्या क्रमांकावर आहे. श्रेयस अय्यर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब किंग्सने त्याला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. व्यंकटेश अय्यर हा तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 23.75 कोटी रुपयांना विकत घेतले. अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांनाही पंजाब किंग्सने विकत घेतले. यावेळी अर्शदीप आणि युझवेंद्र चहलला संघात घेण्यासाठी पंजाब किंग्सने 18 कोटी रुपये मोजले.