Myanmar Thailand Earthquake : म्यानमार भूकंपातील आकडा 10 हजारांवर जाण्याची भीती; थायलंडसह चार देशात धक्क्यांवर धक्के
Myanmar Thailand Earthquake : म्यानमारच्या लष्करी सरकारने किमान 694 मृत्यूची पुष्टी केली आहे, तर 1,670 लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, थायलंडमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

Myanmar Thailand Earthquake : म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा 10 हजारांच्या पुढे जाऊ शकतो. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने हा अंदाज वर्तवला आहे. थायलंड, बांगलादेश, चीन आणि भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. म्यानमारच्या लष्करी सरकारने किमान 694 मृत्यूची पुष्टी केली आहे, तर 1,670 लोक जखमी झाले आहेत. दुसरीकडे, थायलंडमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या आपत्तीत आतापर्यंत 700 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
6 राज्ये आणि संपूर्ण थायलंडमध्ये आणीबाणी
शुक्रवारी सकाळी 11.50 वाजता म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. म्यानमार आणि थायलंडमध्ये 200 वर्षांतील हा सर्वात मोठा भूकंप आहे. प्रचंड विध्वंसामुळे म्यानमारमधील 6 राज्ये आणि संपूर्ण थायलंडमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
म्यानमारमध्ये भूकंपानंतर आणखी 14 धक्के
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार शुक्रवारच्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपानंतर म्यानमारमध्ये आणखी 14 धक्के बसले आहेत. बहुतेकांची तीव्रता 5 पेक्षा कमी होती. सर्वात शक्तिशाली 6.7 तीव्रतेचा धक्का होता जो मोठ्या भूकंपानंतर सुमारे 10 मिनिटांनी बसला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्यानमारला मदत जाहीर केली
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी सांगितले की अमेरिका भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करेल. ट्रम्प म्हणाले की, म्यानमारमध्ये जे घडले ते भयानक आहे. आम्ही तिथे आधीच बोललो आहोत. मदत लवकरच येईल. त्याचबरोबर चीनने म्यानमारमध्ये मदतकार्यासाठी 37 सदस्यांची टीम पाठवली आहे. या टीमकडे भूकंपाचा इशारा देणारी यंत्रणा, ड्रोनसह आपत्कालीन बचावासाठी आवश्यक उपकरणांचे 112 संच आहेत.
म्यानमारच्या सहा राज्यांमध्ये आणीबाणी लागू
म्यानमारमधील भूकंपानंतर देशाच्या लष्करी सरकारने सहा राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली. सागाइंग, मंडाले, बागो, मॅग्वे, शान राज्य (पूर्व भाग), आणि नायपीडाव ही क्षेत्र आहेत. लष्करी सरकारचे नेते जनरल मिन आंग हलाईंग यांनी सांगितले की, मंडाले प्रदेशातील नेपीडॉ येथे 96, सागाइंगमध्ये 18 आणि क्यूक्से टाउनशिपमध्ये 30 लोक मारले गेले.
म्यानमारच्या लष्करी सरकारने मदत मागितली
म्यानमारच्या लष्करी सरकारने पहिल्यांदाच भूकंप मदत कार्यासाठी जगभरातून मदतीचे आवाहन केले आहे. 2021 पासून, लष्करी सरकारच्या कार्यकाळात येथे 6.2 आणि 6.4 तीव्रतेचे मोठे भूकंप झाले आहेत.
सर्व एक लाख भारतीय पर्यटक थायलंडमध्ये सुरक्षित
सर्व एक लाख भारतीय पर्यटक थायलंडमध्ये सुरक्षित आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने एक हेल्पलाइन क्रमांक +66 618819218 जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाधित लोकांच्या कल्याणासाठी शुभेच्छा दिल्या आणि मदतही देऊ केली. मोदी 3 एप्रिल रोजी थायलंडमध्ये बिमस्टेक संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
भारताने म्यानमारला 15 टन मदत सामग्री पाठवली
भारतीय हवाई दलाच्या C130J विमानाने हिंडन एअरफोर्स स्टेशनवरून म्यानमारसाठी उड्डाण केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपग्रस्त म्यानमारला पाठवण्यात येणाऱ्या 15 टन मदत सामग्रीमध्ये तंबू, झोपण्याच्या पिशव्या, ब्लँकेट, खाण्यासाठी तयार अन्न, वॉटर प्युरिफायर, सौर दिवे, जनरेटर सेट आणि आवश्यक औषधे यांचा समावेश आहे.
म्यानमारमध्ये रात्री उशिरा 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला
भारतीय वेळेनुसार, 28 मार्च रोजी रात्री 11.56 वाजता म्यानमारमध्ये 4.2 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला.
म्यानमारच्या मंडाले शहरातील इमारती उद्ध्वस्त झाल्या
म्यानमारमधील ऐतिहासिक राजवाडा असलेल्या मांडले पॅलेसच्या काही भागांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी भूकंपात सागाइंग प्रदेशातील सागाइंग टाउनशिपमधील एक पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. राजधानी नायपीडाव व्यतिरिक्त क्युक्से, पिइन ओ ल्विन आणि श्वेबो येथे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या शहरांची लोकसंख्या 50हजारांहून अधिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
