Russia Ukraine War मुळे तुमच्या खिशावर ताण, दैनंदिन वापरातील वस्तू महागण्याची शक्यता
तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तू ज्या आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत, ज्यामुळे आपलं आयुष्य सोपं बनलं आहे, अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू महागण्याची शक्यता आहे.
मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे तुमच्या-आमच्या खिशावर ताण येण्याची शक्यता आहे. स्मार्ट वॉच असो वा वॉशिंग मशीन, कार असो वा लॅपटॉप, तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तू ज्या आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्या आहेत, ज्यामुळे आपलं आयुष्य सोपं बनलं आहे, अशा सगळ्या प्रकारच्या वस्तू महागण्याची शक्यता आहे.
सर्व प्रकारचे गॅजेट्स, कार, घड्याळ यांमध्ये वापरले जाणारे चिप्स जगातील केवळ तीन देशांमध्ये बनतात. तर त्याचं बहुतांश रॉ मटेरियल युक्रेन आणि रशियात बनतं. चिपसेट म्हणजेच सेमीकंडक्टरचा तुडवडा जाणवू लागला आहे. आता तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. MAIT चे सीईओ जॉर्ज पॉल यांच्या माहितीनुसार, युक्रेन आणि रशियामधील युद्धामुळे युक्रेनची निर्यात क्षमता कमी होत आहे.
या गोष्टींवर परिणाम होणार
रशियावर आर्थिक बंदी घातल्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवू लागला आहे. युद्धामुळे जे रॉ मटेरियल येतं, जसं की तेल, गॅस युरेनियम यांच्या पुरवठ्यावर परिणाम होईल. यापैकी नियॉन, हेलियम, पॅलेडियम हे सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी आवश्यक घटक आहेत. जगभरातील 70 टक्के नियॉन युक्रेनमधून येतं. तर जगातील 40 टक्के पॅलेडियम रशियामधून येतं. युद्धामुळे याचा पुरवठा प्रभावित होत असल्याचं चित्र आहे.
फ्रीज महाग होण्याची शक्यता
गॅजेट्स किंवा टेक्नॉलॉजी प्रॉडक्टमध्ये वापरले जाणारे पदार्थ किंवा धातू आहेत. नियॉन, हेलियम, पॅलेडियमचा वापर सेमीकंडक्टर बनवण्यासाठी होतो. सेमीकंडक्टरचा वापर आज सर्वच प्रॉडक्ट्समध्ये होतो. वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, फ्रीज, मोबाईल फोन, लॅपटॉप या सर्व उत्पादनांमध्ये सेमीकंडक्टरचा वापर होतो. याच्या तुटवड्यामुळे ऑटो मोबाईल, डिस्प्ले: कम्प्युटर आणि टीव्ही बनवताना जाणवेल. सध्या असं कोणतंही प्रॉडक्ट नाही ज्यात सेमीकंडक्टरचा वापर केला जात नाही.
संपूर्ण जगावर परिणाम
युक्रेन आणि रशियामधून तेल, गॅस यांसारखे पदार्थ येतात. याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. भारतावर याचा किती परिणाम होईल हे सांगणं सध्या कठीण आहे, कारण ते ग्लोबल चेनवर अवलंबून असेल. सेमीकंडक्टर एका ठिकाणी बनलो तर उत्पादन दुसऱ्या ठिकाणी घेतलं जातं. सेमीकंडक्टर म्हणजे एखाद्या उत्पादनाचा मेंदू. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स यानंतरचा टप्पा आहे. भारतानेही सेमीकंडक्टर बनवण्यात आत्मनिर्भर होण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यासाठी 5 ते 10 वर्षांचा अवधी लागेल. सेमीकंडक्टर बनवणारे देश फारच कमी आहेत. बहुतांश सेमीकंडक्टर आयात केले जातात.