(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलाचा भीषण कार अपघातात मृत्यू, मित्रांसोबत लाँग ड्राईव्हला जाणं महागात; आरोपी मित्राला अटक
Ashwini Dhir Son Jalaj Accident : 'सन ऑफ सरदार'च्या दिग्दर्शकाच्या 18 वर्षीय मुलाचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. जलज मित्रांसोबत लाँग ड्राईव्हवर गेला होता.
Son Of Sardar Director Ashwini Dhir Son Accident Death : बॉलिवूड चित्रपट निर्माते-दिग्दर्शक अश्विनी धीर यांच्या 18 वर्षीय मुलाचा भीषण कार अपघातात मृत्यू झाला आहे. 'सन ऑफ सरदार' चित्रपटाचे दिग्दर्शक अश्विनी धीर यांच्या 18 वर्षांच्या मुलगा जलज धीर याचा विलेपार्ले येथे अपघात झाला. ड्रिंक अँड ड्राईव्ह अपघातात अश्विनी धीर यांचा मुलगा जलज धीर याचा मृत्यू झाला आहे, त्याच्यासोबत त्याच्या एक मित्रालाही प्राण गमवावा लागला आहे. जलज धीर आपल्या तीन मित्रांसह बाहेर जात असताना त्यांची कार वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एका डिव्हायडरला धडकली आणि हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, गाडी एक 18 वर्षीय तरुण चालवत होता, जो दारूच्या नशेत होता.
प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाच्या मुलाचा भीषण कार अपघातात मृत्यू
'अतिथि तुम कब जाओगे' चित्रपटाचे निर्माते अश्विनी धीर यांचा 18 वर्षीय मुलगा जलज धीर याचा मुंबईतील विलेपार्ले येथे कार अपघातात मृत्यू झाला. रिपोर्टनुसार, जलजने त्याच्या मित्रांना व्हिडीओ गेम खेळण्यासाठी गोरेगाव येथील घरी बोलावलं होतं. नंतर, तो आणि त्याचे तीन मित्र - साहिल मेंढा (18), सार्थक कौशिक (18), आणि जेडेन जिमी (18) लाँग ड्राईव्हला गेले. ते वाटेत एका रेस्टॉरंटमध्ये थांबले आणि जेवले. तिथून परत निघाल्यावर साहिल ड्रायव्हिंग करत होता. त्यावेळी त्याचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार दुभाजकावर आदळली. या अपघातात पुढे बसलेल्या साहिल आणि जेडेनला किरकोळ दुखापत झाली पण, जलज आणि सार्थक यांचा मृत्यू झाला.
मित्रांसोबत लाँग ड्राईव्हला जाणं महागात
अश्विनी धीर यांचा मुलगा जलज धीरचा 23 नोव्हेंबरला सकाळी मुंबईत एका रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात जलजच्या आणखी एका मित्राला आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या रिपोर्टनुसार, जलज त्याच्या इतर तीन मित्रांसह कारमधून लाँग ड्राईव्हला जात होता. या अपघातात त्याच्या आणखी एका मित्राला जीव गमवावा लागला. जलज धीरचा मित्र साहिल मेंढा दारूच्या नशेत होता आणि कार चालवत होता. त्याचा ताबा सुटून हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
नेमकं काय घडलं?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साहिल मेंढा वेगाने कार चालवत होता आणि तो कथितरित्या दारूच्या नशेत होता. 120-150 किमी वेगाने कार धावत होती. कार सहारा हॉटेलजवळ पोहोचल्यावर गोरेगावला जाण्यासाठी उड्डाणपुलाचा वापर करायचा की सर्व्हिस रोडचा वापर करायचा, असा संभ्रम साहिलच्या मनात होता, असं जेडेन यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. या संभ्रमात त्याने आधी गाडी डावीकडे आणि नंतर उजवीकडे वळवली. यादरम्यान कारचं नियंत्रण सुटलं आणि ती महामार्गावरील दुभाजकाच्या खांबाला धडकली.
कधी आणि कुठे झाला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव पूर्वेला असलेल्या जलज धीर यांच्या घरी सर्व मित्र जमले होते. रात्री साडेतीन वाजेपर्यंत चौघे व्हिडीओ गेम खेळले. यानंतर ते लाँग ड्राईव्हला गेले. सर्वांनी आधी वांद्रे येथील सिगडी रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं आणि त्यानंतर पहाटे 4.10 वाजेच्या सुमारास गोरेगाव पूर्वेकडे परतीचा प्रवास सुरू केला. मात्र, वाटेत साहिलचे नियंत्रण सुटलं आणि कार सर्व्हिस रोड आणि पुलाच्या दरम्यान असलेल्या दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातात साहिल आणि जिमी किरकोळ जखमी झाले. मात्र मागच्या सीटवर बसलेले जलज आणि सार्थक गंभीर जखमी झाले.
जलजसोबत सार्थकनेही गमवावा जीव
अपघातानंतर जिमी जेडेनने घटनास्थळी उपस्थित असलेल्या दोन लोकांच्या मदतीने जलजला जोगेश्वरी पूर्व ट्रॉमा रुग्णालयात नेले आणि तेथून त्याला कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आलं, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. दरम्यान, सार्थकला वांद्रे पश्चिम येथील भाभा रुग्णालयात नेलं, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.