शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
राज्यातील शेतकऱ्यांची सरकारने कर्जमाफीबाबत केलेली फसवणूक व कोल्हापूर सांगलीच्या जनतेवर व शेतकऱ्यावर शक्तीपीठचे संकट येत आहे, या संकटाचा निषेध म्हणून काळी गुढी उभा करून जाहीर निषेध करण्यात आला.

Swabhimani shetkari sanghatana : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही अशी केलेली वल्गना तसेच शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज (30 मार्च) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर गुढी पाडव्यादिवशी काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला. स्वाभिमानीकडून (Swabhimani shetkari sanghatana) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी सात वाजता गुढीपाडव्यानिमित्त राज्यातील शेतकऱ्यांची सरकारने कर्जमाफीबाबत केलेली फसवणूक व कोल्हापूर सांगलीच्या जनतेवर व शेतकऱ्यावर शक्तीपीठचे संकट येत आहे, या संकटाचा निषेध म्हणून काळी गुढी उभा करून जाहीर निषेध करण्यात आला.
फडणवीस यांनी समर्थन करून स्वतःचे व सरकारचे अपयश दाखवून दिले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही अशी वलग्ना करून 31 मार्चच्या आत कर्ज भरून टाकण्याचा सल्ला दिला. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीआधी 100 दिवसाच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असल्याची आश्वासन दिले होते. भाजपने काढलेल्या जाहीरनाम्यामध्ये सदर कर्जमाफीचा उल्लेख होता. मात्र, काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन करून स्वतःचे व सरकारचे अपयश दाखवून दिले. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी व जनतेसाठी शक्तिपीठ महामार्ग हा कर्दनकाळ ठरणार आहे. शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्यात महापुराचा धोका वाढणार असून यामुळे शेतीसह सामान्य नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होणार असल्याचे स्वाभिमानीने म्हटले आहे.
तेव्हा अजितदादा यांना तिजोरीची कल्पना नव्हती का?
दरम्यान, अजित पवारांकडून आलेल्या वक्तव्यानंतर राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केला आहे. 31 तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा करताना अजितदादा यांना तिजोरीची कल्पना नव्हती का? शेतकऱ्यांच्या मतासाठी पूर्णपणे गंडवलं जातं आहे. नेत्यांच्या कारखान्यांना थकहमी देताना तिजोरीवर भार पडत नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. गाडीचा एसी बंद पडला म्हणून लगेच जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या घेण्याची ऑर्डर देता, तुम्ही अत्यावश्यक झाला नसता पण राज्यातील शेतकरी दररोज मरतोय त्याकडे कोण लक्ष देणार? असे राजू शेट्टी म्हणाले. 2029 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या























