Solapur : सोलापुरात 6 कोटींचे ड्रग्ज पकडले, दोन आरोपींना अटक; पोलिसांची मोठी कारवाई
Solapur Drugs : सोलापूर पोलिसांनी सापळा रचून सहा कोटी किंमत असलेले 3.10 किलोचे ड्रग्ज पकडले आहे.
सोलापूर: जिल्ह्यातील चिंचोळी MIDC येथील ड्रग्ज फॅक्टरी उघडकीस आणल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी (Solapur Rural Police) आणखी एक मोठी कारवाई केली आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गवरील मोहोळ तालुक्यातील देवडी फाटा येथे पुन्हा ड्रग्ज (Drugs) पकडले आहे. दोन आरोपीकडून 3 किलो 10 ग्रॅम इतके सहा कोटी रुपयांचे ड्रग्ज पोलिसांनी पकडले. दत्तात्रय लक्ष्मण घोडके आणि गणेश उत्तम घोडके (दोघेही रा. औंढी, ता. मोहोळ) असं अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
दोघे आरोपी ड्रग्ज घेऊन देवडी इथे येणारं असल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अद्यापही तपास सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी या दोन्ही आरोपीना सापळा रचत ताब्यात घेतलं होतं.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहोळ तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत देखील छापा टाकला आहे. या कंपनीत पोलिसांना एमडी बनवण्यासाठी लागणार कच्चा माल सापडलेला आहे. दरम्यान आरोपी दत्तात्रय घोडके आणि गणेश घोडके यांना न्यायालयाने 23 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
मोहोळ तालुका ड्रग्जचा अड्डा बनतोय का?
मुंबई, नाशिक पाठोपाठ सोलापूरातही ड्रग्सचा गोरख धंद्याचा मुंबईच्या गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या या कंपनीत ड्रग्ज निर्मिती सुरू असल्याची माहिती मुंबईच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार मुंबईच्या गुन्हे शाखेचे पथकाकडून सोलापुरातल्या चिंचोली एमआयडीसी येथे छापेमारी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित कंपनी सील करून, येथून जवळपास आठ किलो एमडी ड्रग्स जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत ही 16 कोटी रुपये इतकी आहे.
या आधी 2016 साली या ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली होती, त्यावेळीही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडण्यात आलं होतं. आता पुन्हा आठ वर्षांनी त्याच ठिकाणी छापेमारी करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. तसेच आजही सोलापूर पोलिसांनी कावाई करत सहा कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडले आहे. त्यामुळे मोहोळ पुन्हा एकदा ड्रग्जचा अड्डा बनतोय का असा प्रश्न विचारला जात आहे.
ही बातमी वाचा: