संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे मराठी साहित्य संमेलनात पडसाद; अशांत मराठवाड्यावरील ठरावावरून महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: संमेलनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला झालेल्या महामंडळाच्या बैठकीत संमेलनात मांडण्याच्या ठरावांवर चर्चा केली जाते.

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांचा मृत्यू, सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा खून आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे पडसाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उमटले. मराठवाडा साहित्य परिषदेने यासंदर्भात मांडलेल्या ठरावावरून साहित्य महामंडळाच्या बैठकीत खडाजंगी झाली. महामंडळ हा ठराव स्वीकारून समारोपावेळी मांडणार का, हे मात्र रविवारीच स्पष्ट होणार आहे.
संमेलनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला झालेल्या महामंडळाच्या बैठकीत संमेलनात मांडण्याच्या ठरावांवर चर्चा केली जाते. या बैठकीत मराठवाडा साहित्य परिषदेने सध्या गाजत असलेल्या मराठवाड्याच्या प्रश्नांसंबंधीचा ठराव मांडला. 'सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू, संतोष देशमुख यांचा भरदिवसा केलेला खून, गाजत असलेला मंत्र्यांचा भ्रष्टाचार, मंत्र्यांच्या हस्तकाची खंडणीखोरी, हे मराठवाड्याला लागलेले ग्रहण आहे. या घटना हिमनगाचे केवळ टोक असून देशातही मणिपूरसारख्या ठिकाणीही हेच घडते आहे. यावर ठिकठिकाणची सरकारे केवळ बोलघेवडेपणा आणि पक्षपातीपणा करत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय राजकारणाचा विचार न करता ही गुंडगिरी संपवण्याची हमी देण्याची मागणी हे संमेलन करत आहे', असे या ठरावात म्हटले आहे.
मात्र हा ठराव स्वीकारण्यास महामंडळ फारसे उत्सुक नव्हते. 'आपण केवळ साहित्यिक विषयांवर बोलुयात. सामाजिक-राजकीय विषयांवर नको', अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यावर उत्तर देताना मराठवाडा साहित्य परिषदेने 'संमेलनात राजकीय-सामाजिक विषयांवरील परिसंवाद घेतले जातात. मग ठराव का नकोत? आम्ही प्रतिनिधित्त्व करत असलेल्या मराठवाड्यातील जनतेचे प्रश्न मांडण्याची आमची जबाबदारी आहे', अशी भूमिका मांडली. त्यावर हा ठराव सौम्य शब्दांत मांडण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र मराठवाडा साहित्य परिषदेने त्यास नकार दिला. त्यामुळे आता महामंडळ हा ठराव स्वीकारणार की नाकारणार अथवा सौम्य शब्दांत मांडणार, हे रविवारी समारोप सोहळ्यात स्पष्ट होईल. याव्यतिरिक्त ग्रंथालयांना सरकारने अनुदान द्यावे, सीमाभागातील प्रश्नात हस्तक्षेप करून तो प्रश्न सोडवावा, बृहन्महाराष्ट्रातील संस्थांना अनुदान द्यावे, रिद्धपूर येथील मराठी विद्यापीठ लवकरात लवकर कार्यान्वित करावे, आदी ठरावांवरही बैठकीत चर्चा झाली. तसेच, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणारा ठरावही मांडण्याचा प्रस्वात ठेवण्यात आला.
सामाजिक विषयांवर संवेदनशीलतेने भूमिका घेणे आवश्यक- डॉ. रामचंद्र काळुंखे
एकीकडे आपण दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या साहित्यिकांची परंपरा अभिमानाने मिरवतो; मात्र दुसरीकडे त्यांच्यासारखी राजकीय-सामाजिक विषयांवर कणखर भूमिका घेत नाही. हे योग्य नाही. सामाजिक विषयांवर संवेदनशीलतेने भूमिका घेणे आवश्यक वाटल्याने आम्ही हा ठराव मांडला, असं मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी सांगितले.
साहित्य संमेलनावर नाराज का? इंद्रजीत भालेराव म्हणाले..., VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
