Dattatray Bharne : पुण्यात पवार,पाटील-देशमुखांना न मिळालेली पदं मला नशिबाने मिळाली; मंत्री झाल्यानंतर दत्तामामा भरणेंना अजितदादांचा विसर?
Dattatray Bharne Speech : पवार, पाटील, देशमुख, मोहोळ यांना न मिळालेली पदं ही आपल्याला नशिबाने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने मिळाली असल्याचं वक्तव्य क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं.

पुणे : मला मिळालेली मोठी पदं ना पवार घराण्याला मिळाली, ना मोहोळ घराण्याला, ना देशमुख घराण्याला, ना पाटील घराण्याला. नशिबाने असेल, आई-वडिलांची कृपा आणि परमेश्वराचा आशीर्वाद यामुळे ही पदं आपल्याला मिळाल्याचं वक्तव्य क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं. मात्र ही सर्व पदं मिळवताना अजितदादा यांचे श्रेय सांगण्यास मात्र भरणे विसरले. पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये दत्तात्रय भरणे बोलत होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले की, "पुणे जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या खूप मोठे महत्त्व आहे. जिल्ह्यात खूप मोठी राजकीय मंडळी कार्यरत आहेत. मात्र सुदैवाने मला पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन, पुणे जिल्हा बँकेचा चेअरमन, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ही तिन्ही सर्वात मोठी पदं मिळू शकली. यानंतर लगेच आमदार, राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. पुणे जिल्ह्यात मगर, मोहोळ, पाटील, पवार , देशमुख अशी मोठमोठी राजकीय घराणी असताना सर्वात मोठी पदे भूषवण्याचा मान आपल्याला मिळाला."
अजितदादांनी ताकद दिल्याचा विसर
पुणे जिल्ह्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अजित पवार यांनी नेहमीच दत्तात्रय भरणे यांना ताकद देत मोठे करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या निवडणुकीत भरणे यांचा पराभव झाल्यानंतर दादांनी त्यांना पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष करत मोठी ताकद दिली. त्यानंतर दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा इंदापुरातून पराभव करून विधानसभेत प्रवेश केला. हे सर्व पदे देताना अजितदादांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा जिंकण्यासाठी भरणे यांना ताकद दिली होती.
आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्यातील जी मोठी पदं पवारांना मिळाली नाहीत ती आपल्याला मिळाल्याचे सांगितले. हे सर्व नशिबाने, आई-वडील, चुलता-चुलती आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच आपण या पदांचा उपयोग सामान्य जनतेच्या कामासाठी केल्याची भरणे यांनी यावेळी सांगितले.
गेल्यावेळी राज्यमंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांना यावेळी कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यांनी इंदापूरमधून शरद पवार गटाच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला आहे.
ही बातमी वाचा:























