Sangli Crime News: गाडी अडवली, हॉकी स्टीक अन् तलवारीने सपासप वार; सांगलीत पूर्ववैमनस्यातून हॉटेल व्यावसायिकाला खल्लास केलं
Sangli Crime News: मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास कार्वे येथील पुलावर राहुल जाधव यांची ही कार अडवून भररस्त्यातच खून केला.
विटा : किरकोळ भांडणाचा आणि वादाचा राग मनात धरून सांगली जिल्ह्यातील (Sangli) विटा जवळील कार्वे येथे एका हॉटेल व्यावसायिकाचा मध्यरात्री खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भांडणाचा राग मनात धरुन तलवारीने, गुप्तीने, हॉकी स्टीकने खून केल्याचे प्राथमिक तपासात माहिती समोर आली आहे. राहुल जाधव (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास कार्वे येथील पुलावर राहुल जाधव (Rahul Jadhav) यांची ही कार अडवून भररस्त्यातच खून केला. राहुल जाधवच्या (Rahul Jadhav) खून प्रकरणी विटा पोलिसांकडून आतापर्यंत 3 संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या खून प्रकरणी आतापर्यंत 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खून प्रकरणातील अन्य 4 आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे.
नेमकं काय घडलं?
भांडणाचा राग मनात धरून कार्वे (ता. खानापूर) येथील राहुल जाधव (वय 35) या तरूण व्यावसायिकाचा रागातून जीव घेतला गेला. गुप्ती व तलवारीने डोक्यात वार करून, तसेच हॉकी स्टीकने मारहाण करून खून (Murder Case) करण्यात आला आहे. ही घटना कार्वे येथे स्मशानभूमी नजीक असलेल्या रस्त्यावरील पुलावर रात्री बाराच्या सुमारास घडली. याबाबत मृताचा भाऊ राजाराम जाधव (कार्वे) यांनी या खून प्रकरणी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. माणिक संभाजी परीट व गजानान गोपीनाथ शिंदे (मंगरुळ ता. खानापूर), अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव, नितीन पांडुरंग जाधव (सर्व, कार्वे ता. खानापूर) अशी संशयितांची नावे आहेत.
माणिक परीट, गजानन शिंदे व नयन धाबी या तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे विटा पोलिसांनी (Vita Police) सांगितले आहे. राहुल जाधव व संशयित आरोपी यांच्यामध्ये झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून संशयितांनी बेकायदेशीर जमाव जमवून, शस्त्र बाळगून राहुल जाधव यांच्या कारच्या काचा फोडल्या. तलवारीने डोक्यात वार करुन त्यांचा निर्घृणपणे खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वरील संशयितांवर गुन्हा दाखल केल्याचे व अन्य हल्लेखोरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस उपनिरीक्षक व्ही. जी. येळेकर तपास करत आहेत.