Raghunath Kuchik यांची सायबर पोलिसात धाव, बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीविरोधात तक्रार
पुण्याचे शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीविरोधात सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. तरुणीकडून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.
पुणे : पुण्याचे शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी त्यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीविरोधात सायबर पोलिसात धाव घेतली आहे. संबंधित तरुणीकडून आपली बदनामी सुरु असल्याची तक्रार त्यांनी काल (13 मार्च) पुणे सायबर पोलिसात नोंदवली. तरुणीच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलेला नंबर एडिट करुन माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
फेसबुकवर आत्महत्येचा इशारा
12 मार्च 2022 रोजी तरुणीने फेसबुक पोस्ट करत रघुनाथ कुचिक आपल्याला व्हॉट्सअॅपवर धमकावत असल्याचा आरोप केला होता. याचे स्क्रीनशॉटही तिने शेअर केले होते. तसंच आपण आत्महत्या करत असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं. आता ती मुलगी बेपत्ता झाली आहे.
मुख्यमंत्री महोदय, हिची पूजा चव्हाण होऊ देऊ नका : चित्रा वाघ
रघुनाथ कुचिक यांनीच तिला गायब केल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला. त्यामुळे रघुनाथ कुचिक यांच्यावर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. "न्याय मिळत नाही म्हणून आत्महत्या करत स्वत:ला संपवते म्हणत तिने काल FB पोस्ट केली. अजूनही त्या मुलीचा तपास लागत नाही. ती गायब आहे. ती मुलगी कुठे गेली आहे की यानेच तिला गायब केली याचाही तपास करा. हिची पूजा चव्हाण होऊ देऊ नका मुख्यमंत्री महोदय. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कुचिकवर तात्काळ 307 चा गुन्हा दाखल करा. तिच्या मरणाची वाट बघू नका त्याआधी वाचवा तिला, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
Pune Crime : शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
रघुनाथ कुचिक यांची सायबर पोलिसात तक्रार
तर तरुणीच्या याच फेसबुक पोस्टनंतर रघुनाथ कुचिक यांनी पुणे सायबर पोलिसात तक्रार केली. "तरुणीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये माझा नंबर दर्शवत आहे. परंतु हे तिने स्वत: एडिट करुन माझी बदनामी करत आहे. माझी सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरु आहे," असं रघुनाथ कुचिक यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
17 फेब्रुवारी 2022 ही घटना पहिल्यांदा समोर आली होती. तरुणीने याच दिवशी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. लग्नाचे आमिष दाखवत माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, त्यानंतर माझा जबरदस्तीने गर्भपात देखील केल्याचा आरोप तरुणीने कुचिक यांच्यावर केला होता. हा सगळा प्रकार पुण्यातील प्राईड हॉटेल, गोव्यातील बाय द बीच या हॉटेलमध्ये नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 मध्ये घडल्याचं या तरुणीने सांगितलं. यानंतर रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात कलम 376, 313 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्या तरुणीसोबत मुंबईत पत्रकार परिषद घेत रघुनाथ कुचिक यांना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान या प्रकरणात न्यायालयाने रघुनाथ कुचिक यांना अटकपूर्व जामीन दिला आहे.
Chitra Wagh : शिवसेनेच्या रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, चित्रा वाघ यांची मागणी