Satish Bhosale : सतीश भोसलेचा आणखी एक कारनामा उघड; एकाला मारतानाचा व्हिडिओ समोर, पिडीत म्हणाले मला शाळेत नेलं अन् मारलं...
Satish Bhosale : एबीपी माझाच्या टीमने कैलास वाघ यांच्याशी बातचीत केली आहे. तेव्हा त्यांनी काय घडलं, आणि मारहाण का केली त्याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.

बीड : गेल्या काही दिवसांपासून बीडमधील गुन्हेगारी आणि खून प्रकरणाने राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच बीडमध्ये आणखी एका कुख्यात गुंडाचा अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आला. गुंड सतीश भोसले हा एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे बीडमधल्या वाढत्या गुन्हेगारी आणि गुंडप्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. आठ दिवसांपुर्वी बाबी ता. शिरूर येथील ढाकणे नावाच्या व्यक्तीला या सतीश भोसले नावाच्या गुंडाने मारहाण केली असल्याचं समोर आलं. धक्कादायक बाब म्हणजे, हा सतीश भोसले या आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असल्याचं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण विधीमंडळात आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील उचलून धरलं, त्यानंतर आता आणखी एका व्यक्तीला सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.
आणखी एक व्हिडिओ आला समोर
बीड जिल्ह्यातील सुरेश धस यांच्या कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याने एका व्यक्तीला अमानुष मारहाण केली होती, ती व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड येथील कैलास वाघ असल्याचे समोर आला आहे, एबीपी माझाच्या टीमने कैलास वाघ यांच्याशी बातचीत केली आहे. तेव्हा त्यांनी काय घडलं, आणि मारहाण का केली त्याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील महारखेड या गावचा कैलास वाघ हा बीड जिल्ह्यातील सतीश भोसले यांच्या परिचयातील व्यक्तीकडे पोकलेन ऑपरेटर म्हणून कामाला होता. मात्र, कैलास वाघ याला हे काम करायचे नव्हते, म्हणून त्यांनी काम सोडले व तो गावी आला. म्हणून सतीश भोसले यांच्या ओळखीच्या गुंडांनी कैलास वाघ याला त्याच्या मूळ गाव असलेल्या महारखेड येथून उचलून नेऊन बीड जिल्ह्यातील अज्ञात शाळेत नेऊन मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यात कैलास वाघ याने दावा केला आहे की, मला हे काम करायचं नव्हतं म्हणून मी काम सोडलं आणि गावी निघून आलो. मात्र, काम सोडल्यामुळेच मला मारहाण करण्यात आल्याचा दावाही कैलास वाघ याने केला आहे.
मी त्यांच्याकडे कामाला होतो...
मी त्यांच्याकडे कामाला होतो. त्यावेळी माझे त्यांच्याकडे पैसे होते. मी त्यांना पैसे मागितले तेव्हा त्यांनी मला काम का सोडलं असा सवाल केला. त्यांनी मला आमच्या गावातून तिकडे नेलं, मला मारहाण केली. तो व्हिडिओ बघा. मला त्यांनी धमक्या दिल्या तुला गाडीने उडवून टाकेन, जीव घेईन अशी धमकी दिली. मला काम का सोडलं असं त्यांनी म्हटलं होतं. मी त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली. हा व्हिडिओ कोणी व्हायरल केली हे मला माहिती नाही असंही कैलास वाघ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे.
सतीश भोसले कोण आहे?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहे. शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील तो रहिवासी आहे. भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद त्याच्याकडे आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली, तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला. गेल्या 24 तासात वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सतीश भोसले याची चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
बीडमधील शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीला जबर मारहाण झाल्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. यात भाजप पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) याने त्याच्या काही साथीदारांसह एका व्यक्तीला मारहाण केली आहे. यावरून अंजली दमानिया यांनी त्यांच्या सोशल मिडिया एक्सवर पोस्ट करत हे काय आहे? गृहमंत्र्यांनी आणि सुरेश धस यांनी उत्तर द्यावे. हा मारणारा माणूस सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे का? बीडच्या शिरूर तालुक्यात गुंडगिरीचा हा व्हिडीओ पाहा. अद्याप शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले होते. यावरून सुरेश धस यांनी हो, सतीश भोसले हा आमचाच कार्यकर्ता आहे. मारहाण करणारा माझा कार्यकर्ता असला तरी त्याच्याविरोधात तक्रार आली तर ती तक्रार घ्या आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्टीकरण दिले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
