Pune : पत्नीला एड्स असल्याचं खोटं सांगून मागत होता घटस्फोट; न्यायालयानं पतीला फटकारलं
पत्नीची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यासाठी कोणताही पुरावा सादर करण्यात पती अयशस्वी ठरल्याने त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळली आहे.
Pune crime news : पत्नीला एड्स असल्याची खोटी माहिती सांगून घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पुण्यातील एका 44 वर्षीय व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) फटकारलं आहे. पत्नीची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यासाठी कोणताही पुरावा सादर करण्यात पती अयशस्वी ठरल्याने त्यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळली आहे.
मागील आठवड्यात पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात नितीन जामदार आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली होती. पुण्यातील रहिवासी असलेल्या पतीने 6 एप्रिल 2011 त्यांनी याचिका दाखल केली होती. त्यावेळी पुणे कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असल्यामुळं सोडणं ही एक प्रकारची क्रूरता असल्याचं सांगत घटस्फोटाची याचिका फेटाळली होती.
माहितीनुसार, 2003 मध्ये दोघेही विवाहबंधनात अडकलं होते. याचिका दाखल केलेला पती हा आर्टिस्ट आहे. पत्नी देखील पुण्याची रहिवासी होती. काही वर्षांपूर्वी तिला क्षयरोग झाला होता. तिच्यावर उपचारदेखील सुरु होते. पत्नी लहरी, तापट आणि हट्टी होती आणि ती कुटुंबातील सदस्यांशी योग्य रीतीने वागत नाही ज्यामुळे दोघांमध्ये सतत भांडणे होत होती, असा दावा पतीने केला होता.
तर मला एड्स झाला असल्याची बदनामी करुन माझ्या नातेवाईकांमध्ये ही अफवा पसरवून माझा मानसिक छळ केल्याचा आरोप पत्नीने केला आहे. या सगळ्या प्रकरणी पतीच्या दाव्यात काहीही तथ्य आढळलं नसल्याने याचिका फेटाळली होती. मात्र त्यानंतर पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पुरावे देण्यास पती अयशस्वी
तिथंही पतीच्या दाव्यात काहीही तथ्य आढळले नाही. पतीने न्यायालयासमोर मांडलेले पुरावे पुरेसे नाही. पत्नीची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे दर्शविण्यासाठी कोणताही पुरावा देण्यात संबंधित पती असमर्थ ठरला. त्यानंतर उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. दोन वर्ष सोबत असताना दोघांमध्ये कोणतंही भांडण झालं नसल्याचं पतीने कबूल केल्याचं देखील न्यायालयाने नमूद केलं.
पत्नीला एड्स झालाच नव्हता
पत्नीने न्यायालयात एचआयव्ही डीएनए डिटेक्टर सादर केले होते. त्यात डीएनए डिटेक्टरदेखील नसल्याचं चाचणीत पुढे आलं होतं. नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ही चाचणी करण्यात आली होती. त्यात पत्नीला एड्स नसल्याचं सिद्ध झालं होतं, असं न्यायालयाने नमूद केलं आहे. त्यामुळे खोटा दावा करत असलेल्या पतीला न्यायालयाने फटकारत ही याचिका फेटाळली आहे.