2 वर्षांपासून गडबड; मॅनेजरने 122 कोटी खाल्ले; खातेदारांना रडवणाऱ्या 'न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँक' घोटाळ्याची ए टू झेड स्टोरी
सरकारने को ऑपरेटिव्ह बँक मरायला सोडल्या असल्याचे बँक तज्ञ विश्वास उटगी यांचे म्हणणे आहे. ठेवीवरील व्याजावरच बँकेचा नफा असतो.

मुंबई : न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्याने बँकेतील ठेवीदार आणि खातेदार हवालदील झाले आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या बँकेत गडबड सुरू झाली होती, हे बँकेने सादर केलेल्या एन्यूल रिपोर्टवरील बँकेचे संचालक मंडळ पाहून समोर येत आहे. बँकेने त्यांच्या वेबसाइटवर जे एन्यूल रिपोर्ट अपलोड केले आहेत. त्यानुसार, 2023 ला सतीश चंदेर हे चेयरमन तर गौरी भानू या व्हाईस चेयरपर्सन होत्या. मात्र, 25 एप्रिल 2023 पासून पुढे बँकेला चेयरमन पदच नव्हते आणि गौरी भानू यांच्याकडे व्हाईस चेयरपर्सन म्हणून सगळा कारभार होता. तर, फेड्रिक डिसोझा, कुरुष पाघडीवाला, मिलन कोठारे, शिवा कथुरिया, विरेन बरोट हे डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. मग, गेली दीड ते दोन वर्ष बँकेचे चेयरमनपद रिक्त का होते? हा देखील मोठा प्रश्न निर्माण होत आहे.
सरकारने को ऑपरेटिव्ह बँक मरायला सोडल्या असल्याचे बँक तज्ञ विश्वास उटगी यांचे म्हणणे आहे. ठेवीवरील व्याजावरच बँकेचा नफा असतो. मात्र, या बँकेत कर्जबुडीचे प्रमाण वाढले. संचालक मंडळ भ्रष्टाचारी झाले. बुडीत कर्जाचा टक्का पाच टक्केच्या पुढे जाताच बँक धोक्यात असल्याचे आरबीआय मानते. पण, न्यू इंडिया बँकेत हे प्रमाण 15 टक्क्यांच्या वर गेले असल्याची शक्यता उटगी यांनी व्यक्त केली आहे. याला बँकेतीलच सर्व मंडळ जबाबदार असल्याचा आरोप बँकींग तज्ज्ञ विश्वास ऊटगी यांनी व्यक्त केला आहे.
मॅनेजरने केला 122 कोटींचा घोटाळा
अशातच या बँकेचा जनरल मॅनेजर हितेश मेहता याने बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आले आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करीत आहे. हितेश हा बँकेचा अकाउंट हेड होता, त्याच्याकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती. तसेच जीएसटी आणि टीडीएसबाबत आणि पूर्ण अकाउंट सांभाळण्याची जबाबदारीही त्याला देण्यात आली होती. त्याने प्रभादेवी शाखेतून 112 करोड तर गोरेगाव शाखेतून 10 करोड रुपये गायब केल्याची माहिती मिळते आहे. याबाबत बँकेच्यावतीने आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मेहता बरोबर आणखी ही काही आरोपी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त मंगेश शिंदे यांनी दिली.
बँक खातेदार हतबल
30 पेक्षा जास्त शाखा असलेल्या आणि बहुराज्य सहकारी बँकेचा दर्जा मिळविलेल्या न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादण्यासह तिचे संचालक मंडळ बरखास्त करणारी कारवाई केली. तसेच या बँकेवर ‘प्रशासक’ नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे नवीन कर्जवाटपासह सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला देण्यात आले. त्यामुळे या बँकेच्या ठेवीदार आणि ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. बँक खातेदार आणि नागरिक हतबल झाले असून आरबीआयला देखील दोष देत आहेत. दरम्यान, न्यू इंडिया को बँकेचे अनेक राजकीय व्यक्ती ही कर्जदार आहेत. अनेक मोठ्या रकमा कर्ज म्हणून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या बँकेला बुडवण्यात नक्की कोण कोण जबाबदार आहे हे तपासातूनच समोर येईल. मात्र, यात सर्वसामान्य ठेवीदार ज्यांची आयुष्यभराची कमाई ठेवली होती, तो मात्र हतबल होऊन रोज बँकेच्या दारात उभा राहतोय ही ह्रदयस्पर्शी घटना आहे.
हेही वाचा
गंगा नदीत डुबकी; धर्मांतर विरोधी कायद्यावर थेट कुंभमेळ्यातून मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य























