मुस्लीम समाज माझ्यामागं दैवतासारखा उभा राहिला; बजरंग सोनवणेंनी सांगितलं विजयाचं राज'कारण'
बीडच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे 6 हजारांपेक्षा जास्त मतं घेऊन विजयी झाली.
मुंबई/बीड : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता प्रत्येक मतदारसंघातील विजयाचं विश्लेषण आणि कारणमिमांसा होत आहे. राज्यातील काही महत्त्वाच्या लढतीपैंकी एक अससेल्या बीडमधील पंकजा मुंडे (Pankaja Munde) विरुद्ध बजरंग सोनवणे यांच्या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. राज्यातील सर्वात शेवटी जाहीर झालेल्या या निकालावरही सर्वांच्या नजरा होत्या. अखेर रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बजरंग सोनवणेंना 6 हजार मतांनी विजयी घोषित केले. त्यानंतर, सोनवणे समर्थकांसह मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. बजरंग सोनवणेंनी (Bajrang sonavane) विजयानंतर रात्री उशिरा उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांची भेट घेतली. तसेच, दादा, तुमच्यामुळेच मी खासदार झालो, असेही त्यांनी म्हटले होते. आता, बीडमधील मुस्लीम समाजही माझ्या पाठीशी दैवतासारखा उभा राहिल्याचे सोनवणेनी म्हटलं आहे.
बीडच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे 6 हजारांपेक्षा जास्त मतं घेऊन विजयी झाली. सोनवणेंच्या विजयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, आम्हाला बजरंग बली पावला, बजरंग बप्पा जायंट किलर आहेत, अशा शब्दात बीडमधील विजयावर आनंद व्यक्त केला. अर्थातच,मराठवाड्यासह राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे बीड जिल्हा धगधगत होता. बीडमध्ये या आंदोलनाची धग कायम होती, त्यातच उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रस्थानही बीड जिल्हाच राहिला आहे. त्यामुळे, मनोज जरांगे व मराठा आंदोलनाचा थेट फायदा बजरंग सोनवणेंना झाला. निवडणूक निकालानंतर हे स्पष्ट झालं असून सोनवणेंनीही ते मान्य केलं आहे. तसेच, मुस्लीम समाजाचाही आपल्याला मोठा पाठिंबा मिळाल्याचही सोनवणेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं.
''बीड लोकसभा मतदारसंघातील सामाजिक समीकरण जर बघितलं, तर मुस्लीम समाजानेही मला एवढी टोकाची मदत केली, खूप खूप डोक्यावर घेतलं. मराठा समाजानी किंबहुना मला कुठे सोडलं, पण मुस्लिम समाजाने मला कुठेही सोडलेलं नाहीये. मुस्लीम समाज हा माझ्या मागं दैवतासारखं उभा राहिला,'' असे म्हणत बजरंग सोनवणेंनी बीडमधील विजयामागचं सामाजिक समीकरण सांगितलं. दरम्यान, बीडमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाजाचं मतदान आहे, यंदाच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यात मतदानाची टक्केवारीही वाढल्याचं दिसून आलं.
मशिदींतून फतवे निघाल्याचाही प्रचार
बीड लोकसभा मतदारसंघात मराठा, वंजारी आणि मुस्लीम समाजाचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे. त्यापैकी, मराठा आणि मुस्लीम समाजाचं मोठ्या संख्येने मतदान बजरंग सोनवणेंना मिळालं आहे. सोनवणेंनी स्वत: याची कबुली दिली आहे. दरम्यान, देशपातळीवरील भाजपने हिंदुराष्ट्र म्हणत आणि हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन प्रचार केला. त्यामुळे, अल्पसंख्यांक समाजाच्या मनात मोदी सरकारबद्दल असुरक्षितेची भावना जाणवत होती. त्यातूनच, अनेक मशिदींमधून भाजपला मतदान न करण्याचं आवाहन करण्याचे फतवेही काढण्यात आल्याचं भाजपच्या काही उमेदवारांनी जाहीरपणे म्हटले. अर्थात, राज्यातील निवडणूक निकालानंतर हेही स्पष्ट झाले आहे.