Shivsena: शिंदे साहेब विधानसभेला मोदी-शाहांकडून 100 जागा मागा, वाटल्यास मला मोदी साहेबांकडे घेऊन चला: रामदास कदम
Shiv Sena foundation day: भाजपची मंडळी उठली, आमची जागा, आमची जागा, आमची जागा. वेळेत जागावाटप झाले असते तर माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती, माझा हेमंत पाटील दिल्लीत गेला असता, माझा नाशिकचा हेमंत गोडसे दिल्लीत गेला असता.
मुंबई: लोकसभा निवडणुकीत नाशिक, हिंगोली, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाचे उमेदवार जाहीर करण्यास झालेल्या विलंबावरुन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या. या जागांवर योग्य वेळेत उमेदवार जाहीर झाले असते तर आज वेगळेच चित्र दिसले असते. पण एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उमेदवार जाहीर करायचा अवकाश की भाजपचे नेते लगेच संबंधित जागांवर दावा सांगायचे. आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) तशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून जागावाटपाची बोलणी करायला मला पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे घेऊन चला, असे वक्तव्य रामदास कदम यांनी केले. ते बुधवारी मुंबईतील वरळी डोम येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलत होते.
या सोहळ्यात रामदास कदम यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत कोणाचाही मुलाहिजा न बाळगता जोरदार राजकीय फटकेबाजी केली. लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्द्यावरुन झालेला गोंधळ आणि विलंबाबाबत त्यांनी परखडपणे भाष्य करत भाजप नेत्यांना टोले लगावले. यावेळी रामदास कदम यांनी म्हटले की, एक हात जोडून फक्त विनंती आहे शिंदे साहेबांना, आपल्या भाजपच्या नेत्यांना सांगा. मला माहिती आहे कोणीही बोलणार नाही या विषयावर. मला घेऊन जा मोदी साहेबांकडे मी सांगेन साहेब, वेळेवर एकनाथ शिंदेंचे 15 उमेदवार दोन महिन्यांपूर्वी दिले असते तर आज चित्र वेगळं असतं.माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती, माझा हेमंत पाटील दिल्लीत गेला असता, माझा नाशिकचा हेमंत गोडसे दिल्लीत गेला असता, असे कदम यांनी सांगितले.
पण एकदा शिवसेनेचा उमेदवार शिवसेनेने जाहीर केला की, भाजपची मंडळी उठली, आमची जागा, आमची जागा, आमची जागा. अरे ही काय भानगड आहे. साहेब हे थांबवा, नाहीतर मला घेऊन जा. शिंदे साहेब मोदी आणि शाह साहेबांना सांगा, मला 100 उमेदवार द्या, 90 आमदार आपण नाय निवडून आणले तर तुम्ही सांगाल ते आम्ही करु. तुम्ही विधानसभा निवडणुकीला 100 जागा मागून घ्या. या एक-दोन वर्षात आपण क्रांतिकारी निर्णय घेतले. महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासात असे निर्णय कोणत्याही मुख्यमंत्र्याने घेतले नाहीत. ते निर्णय तुम्ही घेतलेत, अशा शब्दांत रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.
अजितदादा थोडे दिवस नसते तरी चालले असते: रामदास कदम
शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात रामदास कदम यांनी महायुतीमधील अजित पवार यांच्या समावेशाबाबत नाराजी व्यक्त केली. फडणवीस साहेब धन्यवाद, पण अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते, असे कदम यांनी म्हटले. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'ऑर्गनायझर' मुखपत्रातून अजित पवार यांच्यामुळे भाजपच्या ब्रँडला धक्का बसला, अशी टिप्पणी करण्यात आली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या रामदास कदम यांनीही अजित पवार यांच्यामुळे महायुतीला कमी जागा मिळाल्याचा सूर आळवल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा