Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Abu Azmi : अबू आझमी यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Sanjay Raut on Abu Azmi : समाजवादी पक्षाने (Samajvadi Party) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. बाबरी मशीद विध्वंसाबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) भूमिकेमुळे समाजवादी पक्षाने हा निर्णय घेतल्याची माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी (Abu Azmi) यांनी दिली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष हा भाजपची बी टीम म्हणून काम करते, असा हल्लाबोल केला. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अबू आझमींवर निशाणा साधला आहे.
...तर अबू आझमी निवडून आले नसते
संजय राऊत म्हणाले की, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आहेत. आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. त्यांनी आम्हाला सरकार स्थापनेला मदत केली होती. फक्त राज्यसभेवेळी त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत. मानखुर्दला मी प्रचाराला गेलो होतो. आमच्यावर उमेदवार देण्यासाठी प्रेशर होता पण आम्ही आघाडी म्हणून तिथे उमेदवार दिला नाही. आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडून आले नसते, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी अबू आझमी यांनी दिले आहे.
लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेऊ नका, हीच प्रार्थना
लाडकी बहीण योजनेत ज्या लाभार्थ्यांचे अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे किंवा त्यांच्या घरी वाहन आहे, अशा लाभार्थ्यांना या योजनाचा फायदा घेता येणार नाही. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, निवडणुकीच्या आधी कोणतीही शहनिषा न करता सरसकट 1500 रुपयांचा व्यवहार केला, त्यावर अनेकांचे आक्षेप होते. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवस आधी सांगितलं होतं की निकष बदलावे लागतील. निकष, नियमांचं त्यांना भान राहिलं नाही. त्यांना मतं विकत घ्यायची होती. अनेक कमावत्या महिलांचं उत्पन्न चांगलं आहे, अशा घरातील तीन महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत. काही लाख महिलांना आतापर्यंत पैसे दिल्यावर हे लक्षात आलं का? आमची एवढीच प्रार्थना आहे की, ज्या महिलांना पैसे दिले ते परत घेऊ नका, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी महायुती सरकारवर केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या