Arunachal Pradesh Vidhansabha Election: भाजपने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला चोपलं, अजित पवारांच्या पक्षाकडून भाजपविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Arunachal Pradesh Vidhansabha Election: अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 8 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहा उमेदवार रिंगणात उतरले होते.
मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने महाराष्ट्रात अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून आमचे सूर कसे जुळले आहेत, आम्ही दीर्घकाळ एकत्र राहू, अशा आणाभाका घेतल्या जात असताना अरुणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) मात्र या दोन्ही पक्षांमध्ये चांगलेच फाटले आहे. कारण, अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) भाजपविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षावर भाजपकडून जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा आरोप अजितदादांच्या पक्षाने केला आहे. लिका सय्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. त्यांच्यावर भाजपने हल्ला केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सुरक्षा द्या, अशी मागणी अजितदादांच्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
7 मार्च 2024 रोजी अरुणाचल प्रदेशातील नानसई विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार उमेदवार श्री लिका सय्या यांच्यावर भाजप उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक आणि अरुणाचल प्रदेशचे प्रभारी संजय प्रजापती यांनीही यावेळी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खालीलप्रमाणे
1) लिखा साया - याचुली विधानसभा
2) तपंग तलोह - पंगिन विधानसभा
3) लोमा गोलो - पक्के केसांग विधानसभा
४) न्यासन जोंगसम - चांगलांग उत्तर
5) नगोलिन बोई - नामसांग विधानसभा
6) अजू चिजे - मेहचुका विधानसभा
7) मोंगोल यामसो - मनियांग जेकू विधानसभा
8) वकील सलमान मोंगरे - चांगलांग दक्षिण विधानसभा
महाराष्ट्रात राष्ट्रवादी-भाजपचं मनोमीलन
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समन्वयाने सर्व अडचणी दूर केल्या जात आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात बंड केले होते. मात्र, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत घालत त्यांना माघार घेण्यासाठी राजी केले होते. त्यामुळे बारामतीची लढाई अजित पवार यांच्यासाठी काहीशी सोपी झाली आहे. अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आपली सर्व ताकद भाजपच्या पाठिशी उभे करण्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा
भाषण सुरु असताना फडणवीस अचानक म्हणाले, 'पवारसाहेब आपल्या पाठिशी'; अकोल्यात नेमकं काय घडलं?