परभणीकरांसाठी आनंदाची बातमी! येलदरी आणि निम्न दुधनाच्या धरणसाठ्यात वाढ
Parbhani Dam water storage: गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह परभणीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
Parbhani Dam water storage: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण जिल्ह्यातील येलदरी आणि निम्न दुधना हे दोन्हीही मोठ्या प्रकल्पात पाणीसाठा वाढलाय. मागील तीन दिवसाच्या पावसामुळे दोन्ही प्रकल्पातील पाणी 3 टक्क्यांनी वाढलं आहे. मृतसाठ्यात गेलेल्या निम्न दुधना धरणात आता ५.३ टक्के पाणीसाठा झाला आहे.
राज्यभरात सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली असून मागील तीन दिवसात झालेल्या पावसामुळे धरण साठ्यात चांगलीच वाढ होताना दिसत आहे.
मायनसमध्ये गेलेले निम्न दुधना धरण आले शुन्यावर
दरम्यान परभणी जिल्ह्यातील सर्वाधिक पाणी क्षमता असणारे निम्न दुधना धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मृतसाठ्यात गेलेला निम्न दुधना प्रकल्प आता शून्यावर आला आहे. निम्न दुधनामध्ये आता 5.3% एवढा पाणीसाठा झाला असून मागील वर्षी याच काळात निम्न दुधना 25.50 टक्क्यांनी भरलेले होते. परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठे निम्न दुधना धरण यंदा पाऊस कमी झाल्याने तसेच वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे मायनसमध्ये गेले होते. मागील तीन दिवस होत असणाऱ्या पावसाने धरणातील पाणीसाठ्यात वाढ हाेत आहे.
येलदरी धरणातही पाणी वाढले
हिंगोलीतील येलदरी प्रकल्पातही मागील तीन दिवसात झालेल्या पावसामुळे 12 दशलक्ष घनमीटर पाणी वाढले आहे. येलदरीत आज 29.62% एवढा पाणीसाठा आहे. हिंगोली जिल्ह्यात असणारा सर्वाधिक पाणीक्षमतेच्या येलदरी प्रकल्पावर हिंगोलीसह परभणी, जिंतूर शहरांसह अनेक गावांची तहान भागली जाते. मागील वर्षी झालेल्या तुटपुंज्या पावसाने मराठवाड्यातील धरणे मृतसाठ्यात गेल्याचे चित्र होते. यंदा जोरदार पावसाची हजेरी होत असल्याने मृतसाठ्यात गेलेल्या धरणांच्या पाणीपातळीत हळूहळू वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांसह परभणीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
मराठवाड्यात राहिलाय एवढा धरणसाठा
मराठवाड्यातील एकूण 44 धरणांमध्ये आता 11.05% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाड्यात सध्या हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून पाणीसाठात हळूहळू वाढ होत आहे. मागील वर्षी याच काळात मराठवाड्यातील धरणांमध्ये 30.99% पाणी शिल्लक होते. राज्याच्या धरणासाठ्याच्या तुलनेत मराठवाड्यातील धरणांमधील असणारा पाणीसाठा हा सर्वात कमी असल्याचे जलसंधारण विभागाच्या माहितीवरून दिसून येते.
हेही वाचा: