कार अन् दुचाकीचा भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी
पिंपरखेड टोल नाका परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला.

नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव येथे कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात (Accident) पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाका परिसरात हा अपघात झाला. अपघातातील जखमींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले असून पोलीस व स्थानिकांच्या मदतीने मदत व बचावकार्य करण्यात आले. भाऊसाहेब माळी, लंकाबाई माळी (रा.नाग्या -साक्या) असे अपघातातील मयत पती-पत्नीचे नाव आहे. अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की, अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला असलेल्या नाल्यात फेकली गेली आहेत. नाशिकच्या (Nashik) नांदगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
पिंपरखेड टोल नाका परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवले. मात्र, अपघातातील पती-पत्नीला उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान, जखमींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून अपघाताच्या घटनेचा अधिक तपास करण्यात येत असून प्राथमिक माहितीनुसार दोन्हीही वाहने वेगात धावत होती. त्यामुळे, अपघात एवढा भीषण झाला की दुचाकी व कारही नाल्यात जाऊन पडली. कारमधील प्रवासी गंभीर जखमी असून कारचेही अतोनात नुकसान झाले आहे. तर, दुचाकीही चेंदामेंदा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या घटनेनं नांदगाव परिसरातील शोककळा पसरली असून मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
हेही वाचा
आमदारांसह पोलिसांची कॉलेज परिसरातील कॅफेंवर धाड; पडद्याआड अश्लील चाळे, तरुण-तरुणी ताब्यात
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
