MHADA Nashik : नाशिककरांनो! स्वस्तात फ्लॅट हवाय? म्हाडाकडून 493 घरांसाठी मोठी घोषणा, घरे कुठे अन् किंमती किती? जाणून घ्या सविस्तर
MHADA Nashik : म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने 20 टक्के समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

Mhada : म्हाडाच्या नाशिक गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने 20 टक्के समावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 493 परवडणाऱ्या घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. मंडळाच्या कार्यालयात आयोजित गो-लाइव्ह कार्यक्रमात नाशिक मंडळाचे अध्यक्ष रंजन ठाकरे यांनी नोंदणीचे औपचारिक उद्घाटन केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि निम्न उत्पन्न गट (LIG) यांना सेवा देणारी ही घरे नाशिकमधील मखमलाबाद शिवार, सातपूर शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार आणि इतर अनेक ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. एकूण 291 घरे सर्वसाधारण लॉटरीद्वारे उपलब्ध आहेत. तर 202 घरे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर वाटली जाणार असल्याची माहिती रंजन ठाकरे (Ranjan Thakare) यांनी दिली आहे.
विकासकांकडून नाशिक मंडळाला 20 टक्के योजनेतील घरे देण्यास टाळाटाळ होत आहे. मात्र तरीही म्हाडा प्राधिकरण आणि नाशिक मंडळ ही घरे मिळविण्यासाठी सातत्याने नाशिक महानगरपालिकेसह विकासकांकडे पाठपुरावा करीत आहे. या पाठपुराव्यामुळे नाशिक मंडळाला नुकतीच 20 टक्क्यातील 493 घरे उपलब्ध झाली आहेत. या घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून नुकतीच नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात करण्यात आली आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यानुसार घरे (202)
- पिंपळघाव बहुला शिवार (1 बीएचके) - 70 घरे
- पिंपळघाव बहुला शिवार (2 बीएचके) - 55 घरे
- नांदुर दसक शिवार - 51 घरे
- देवळाली शिवार - 21 घरे
- मोजे दसक - 5 घरे
सर्वसाधारण लॉटरीद्वारे घरे (एकूण 291)
- म्हसरुळ शिवार (1 बीएचके) - अल्प उत्पन्न गट - 48 घरे
- म्हसरुळ शिवार (2 बीएचके) - अल्प उत्पन्न गट - 54 घरे
- सातपूर शिवार - अल्प उत्पन्न गट - 23 घरे
- पाथर्डी शिवार - अल्प उत्पन्न गट - 12 घरे
- विहितगांव शिवार - अल्प उत्पन्न गट - 33 घरे
- मखमलाबाद शिवार - अत्यल्प उत्पन्न गट - 40 घरे
- मखमलाबाद शिवार - अल्प उत्पन्न गट - 19 घरे
- द्वारका - अल्प उत्पन्न गट - 22 घरे
- वडाळा नाशिक शिवार - अल्प उत्पन्न गट - 28 घरे
- नाशिक शिवार, हिरावाडी - अल्प उत्पन्न गट - 12 घरे
घरांच्या किंमती पुढीलप्रमाणे
- मखमलाबाद शिवार येथील अवध युटोपिया प्रकल्पातील 70 घरे अत्यल्प उत्पन्न गटातील असून 29.97 चौ. मीटर क्षेत्रफळाच्या या घराच्या किंमती 12 लाख 73 हजार 985 ते 17 लाख 47 हजार 336 रुपये अशा आहेत.
- सातपूर शिवार, मखमलाबाद शिवार, पाथर्डी शिवार, विहितगाव शिवार यासह अन्य काही ठिकाणची घरे अल्प गटातील आहेत. या घरांच्या किंमती 13 लाख ते 12 लाखांच्या दरम्यान आहेत.
- गणेश आरंभ, मौजे पिंपळगाव, बहुला शिवारमधील 70 घरांसह अन्य ठिकाणच्या 202 घरांचा समावेश प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेत करण्यात आला आहे. त्यामुळे 14 ते 23 लाख रुपयांदरम्यान किंमती असलेल्या या घरांसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नसून प्रथम अर्ज करणाऱ्या पात्र अर्जदाराला घराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती रंजन ठाकरे यांनी दिली आहे.
6 मार्चपर्यंत करता येणार अर्ज
दरम्यान, या घरांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली आहे. 6 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यानंतर 7 मार्च रोजी रात्री 11.51 वाजेपर्यंत ऑनलाइन व्यवहारांद्वारे पेमेंट करता येणार आहे. तर आरटीजीएस/एनईएफटी व्यवहार त्याच दिवशी बँकिंग वेळेत पूर्ण करावे लागतील. मंजूर अर्जदारांची अंतिम यादी 13 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल. अर्जदार सामान्य योजनेसाठी housing.mhada.gov.in वर नोंदणी करू शकतात. तर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असलेले अर्ज lottery.mhada.gov.in वर सादर करता येणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
