(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : भारतीयांना युद्धनीतीचे धडे मिळाले तर, कुणीही जवान शहिद होणार नाही : राज्यपाल कोश्यारी
Nashik News : शस्र आणि अस्रांची निर्मिती देशातच करण्याच्या संकल्पनेतून 100 सैनिकी शाळा (Army School) भारतात निर्माण केल्या जाणार असल्याची माहिती राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांनी दिली.
Nashik News : वेद, अस्र,शस्र आणि शास्त्र भारतात अनादी काळापासून नांदत आहेत. आम्ही भारतीय जेवढे पूजेसाठी शांत असतो तेवढेच क्रांतीसाठी ही शस्रसज्ज असतो, त्यामुळे पूजेतील शांती आणि शस्रातील क्रांती ही भारतीयांची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी केले आहे. ते आज येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या 85 व्या स्थापना दिनी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
नाशिक (Nashik) येथील भोसला मिलिटरी स्कूलच्या (Bhosala Military School) 85 व्या स्थापना दिनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे नाशिकमध्ये होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश संरक्षणदृष्ट्या आत्मनिर्भर होतो आहे. आपल्या शस्र आणि अस्रांची निर्मिती देशातच करण्याच्या संकल्पनेतून 100 सैनिकी शाळा भारतात निर्माण केल्या जाणार आहेत. बालपणापासून देशभक्ती आणि शस्र चालविण्याचे आणि युद्धनितीचे धडे आम्हा भारतीयांना मिळाले तर भविष्यात कुणीही जवान शहिद होणार नाही, असे सांगून या सर्व सकल्पनांची पायाभरणी 1935 मध्ये डॉ. बाळकृष्ण शिवरामपंत मुंजे यांनी भोसला मिलिटरी स्कूलच्या माध्यमातून केली असल्याचेही राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले.
ते म्हणाले आम्हा भारतीयांच्या सर्वांगीण संस्कृतीला दडपण्याचा प्रयत्न ब्रिटीशांनी केला. भारतीयांचे ज्ञान, विज्ञान आणि बुद्धीमत्तेला नेहमीच कमकुवत करण्याचे व तसे बिंबवण्याचे प्रयत्न इंग्रजांनी वेळोवेळी केले. परंतु आपली संघर्षाची आणि विजयाची परंपरा रावणाच्या पराभवापासून सुरू होते आणि ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त होईपर्यंत ती आजही कायम आहे. आमची शस्र परंपरा आणि अस्रांची शक्ती अनादी आहे, शाश्वत आहे, आमच्या देव-देवतांही शस्रधारी आहेत, आमच्या मुली सैनिकी शिक्षणातून माता दुर्गा बनून दृष्टांचा, शत्रुंचा विनाश करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रभु रामचंद्र यांनी सोन्याची लंका जिंकूनही तिच्या मोहात न अडकता माता आणि मातृभुमीला स्वर्ग मानले. जिंकल्यानंतर शत्रुला गुलाम बनविण्याची आमची परंपरा नसून शत्रुलाही सन्मापूर्वक वागविण्याची आमची संस्कृती यातून अधोरेखित होते, असेही यावेळी कोश्यारी म्हणाले.
गौरवशाली परंपरेचे कौतुक
यावेळी सेंट्रल हिदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोसला मिलिटरी स्कूलच्या ऐतिहासिक व गौरवशाली परंपरेचे कौतुक केले. येथून शिक्षण घेणारे विद्यार्थी व त्यांचे पालक भाग्यशाली असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन करताना राज्यपाल कोश्यारी यांनी या संस्थेस त्यांच्या अधिकारात असलेल्या फंडातून 25 लाख रूपयांची देणगीही यावेळी जाहीर केली. यावेळी प्रास्ताविकातून संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचे माहिती महासचिव दिलीप बेळगांवकर यांनी दिली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थ्यांच्या विविध दलांनी संचलन, प्रात्यक्षिकांमधून उपस्थितांची मने जिंकली