Nandurbar News : नंदुरबार परिवहन विभागाची रस्ता सुरक्षा मोहीम, अधिकाऱ्यांकडून बसमध्ये जनजागृती
Nandurbar News : सध्या राज्यभरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सध्या नंदुरबार जिल्हा परिवहन महामंडळाच्या विभागाकडून रस्ता सुरक्षा मोहीम सुरु करण्यात आली आहे.
Nandurbar News : नंदुरबार (Nandurbar) जिल्हा परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाची (Road Safety Week) सुरुवात झाली असून रस्ता सुरक्षा सप्ताह कागदावर न साजरा करता प्रत्यक्षात नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करण्यात येत आहे.
सध्या राज्यभरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी स्थानिक पोलीस प्रशासन (Nandurbar Police) आणि आरटीओ (RTO) वेळोवेळी जनजागृती करत आहे. मात्र अपघात नित्याचे झाले आहेत. अशातच सध्या नंदुरबार जिल्हा परिवहन महामंडळाच्या विभागाकडून रस्ता सुरक्षा मोहीम सुरु करण्यात आली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन झाल्यानंतर परिवहन विभागाचे अधिकारी जाधव आणि कर्मचाऱ्यांनी बस स्थानकावर जाऊन विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह संदर्भात माहिती देऊन वाहतुकीचे नियम पाळण्याचे आव्हान करत आहेत.
ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी नंदुरबार शहरात येत असतात. हे विद्यार्थी एसटी बसने प्रवास करत असतात. प्रत्येक एसटी बसमध्ये जाऊन परिवहन विभागाचे अधिकाऱ्यांनी हेल्मेट आणि त्याच्या वापराचे फायदे विद्यार्थ्यांना समजून सांगितले. पालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्व समजून सांगण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे.
बसमध्ये जाऊन रस्ता सुरक्षा जनजागृती..
ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी दुचाकी आणि चार चाकी वाहने असतीलच त्यांची पालक मोठ्या प्रमाणात वाहनांचा वापर करतात. मात्र ग्रामीण भागात वाहनांचा वापर करत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्याचे अनेक वेळा समोर आलेला आहे. होणाऱ्या अपघातात अनेकांना जायबंदी व्हावे लागते. तर काहींना आपला जीव गमवावा लागतो. आपल्या पालकांना मुलांनी समजून सांगितले. तर पालक त्यांच्या ऐकत असतात. त्यामुळे थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांना रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतुकीचे नियम आणि सुरक्षितता आणि वाहनचालकांची जबाबदारी हे समजून सांगितल्याने अपघाताच्या प्रमाण कमी होण्यास मदत होईल हे मात्र निश्चित.
महाराष्ट्रातील रस्ते अपघाताचं प्रमाण वाढलं
मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील रस्ते अपघाताचं प्रमाण वाढले आहे. जानेवारी 2022 ते जून 2022 या सहा महिन्यात महाराष्ट्रामध्ये 17 हजार 275 अपघात झाले आहेत. यामध्ये आठ हजार 68 जणांचा मृत्यू झालाय. तर 14 हजार 200 जण जखमी झाले आहेत. 2018 मध्ये रस्ते अपघातात राज्यात 13 हजार 261 जणांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये 12788 तर 2020 मध्ये 11 हजार 569 जणांचा मृत्यू झाला होता. 2019-20 मध्ये अपघातातील मृताची संख्या घटली होती. मात्र, 2021 मध्ये यामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. 2021 मध्ये रस्ता अपघातात 13 हजार 528 जणांचा मृत्यू झाला. 2021 जानेवारी ते जून या कालावधीत सहा हजार 837 जणांचा मृत्यू झाला होता. तर 2022 मध्ये जानेवारी ते जून या कालावधीत आठ हजार 68 जणांचा मृत्यूची नोंद झाली आहे.
हेही वाचा
Road Accident: एक डुलकी अन् जीवाशी खेळ! सर्वाधिक रस्ते अपघात 'या' वेळेतच होतात- काय आहेत कारणं