Thane News : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला संपवलं, पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न
Thane Crime News : भिवंडीत रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने पत्नीच्या पोटावर आणि गळ्यावर मटण कापण्याच्या सुऱ्याने वार केले.
Thane Crime News : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत भिवंडीमधील एका व्यक्तीने मटण कापण्याच्या सुऱ्याने तिची हत्या केल्याची घटना घडला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वत:चं आयुष्य संपवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, परिसरातील लोकांनी त्याचा जीव वाचवला अन् पोलिसांच्या स्वाधीन केलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. आनंद वाघमारे असे पत्नीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुडील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी परिसरात रविवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. आरोपीने पत्नीच्या पोटावर आणि गळ्यावर मटण कापण्याच्या सुऱ्याने वार केले. त्यानंतर पतीने आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी मारली. हा संपूर्ण प्रकार पाहून स्थानिकांनी तात्काळ तलावात उड्या मारत आनंदला बाहेर काढलं. त्याचवेळी उपस्थितापैकी एका व्यक्तीने पोलिसांना या घटनेबाबत माहिती दिली होती. त्याचवेळी पोलीस घटनास्थळावर दाखल झाले होते. स्थानिकांनी आरोपीला तात्काळ पोलिसांकडे सोपवलं. मात्र या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत त्याला अटक केली आहे
भिवंडी शहरातील पद्मानगर परिसरातील मिलिंद नगर या भागात राहणारा आनंद वाघमारे याचे कामतघर परिसरात मटण विक्रीचे दुकान आहे. त्याची पत्नी मीना ही सुद्धा त्यास व्यवसायात मदत करत होती. यादरम्यान मागील काही दिवसांपासून आनंद हा आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणामुळे दोघांमध्ये सतत भांडण होत होती. मागील तीन दिवसांपासून हा वाद वाढत गेला. रविवारी सायंकाळी दोघे घराकडे जात असतानाच वऱ्हाळ देवी मंदिर परिसरात त्यांच्यात वाद होऊन कडाक्याचं भांडण झाले. राग अनावर झालेल्या आनंद याने आपल्या सोबत असलेल्या पिशवीतील मटण कापण्याचा सुरा काढून पत्नी मीना हिच्या गळ्यावर पोटावर सपासप वार केले. अन् नजीकच्या तलावात उडी मारली. तो गटांगळ्या खात असताना परिसरातील युवकांनी पाण्यात उड्या मारून त्याला पाण्याबाहेर काढले. तोपर्यंत नागरीकांनी त्याच्या पत्नीस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याचप्रमाणे पोलिसांना पाचारण केले होते. स्थानिकांनी आरोपी आनंद यास पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान उपचार सुरु असताना पत्नी मीना हीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करीत पती आनंद यास ताब्यात घेत अटक केले आहे. पुढील तपास सुरु आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live