(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना काळात हॅण्ड ग्लोव्जचा तुटवडा, रुग्णालयांमध्ये हातमोज्यांचा पुरवठा विस्कळीत
कोरोना काळात हॅण्ड ग्लोव्जचा तुटवडा निर्माण झाला आहे. हातमोज्यांचे उत्पादन करणारे मोजकेच उत्पादक राज्यात असल्यामुळे पुरवठ्यावर प्रचंड ताण येत आहे.
मुंबई : कोरोना संसर्गामध्ये काळजी घेण्याबरोबरच विविध शस्त्रक्रिया, वैद्यकीय तपासणीसाठी लागणाऱ्या वैद्यकीय हातमोज्यांचा (ग्लोव्ज) तुटवडा मुंबईतील रुग्णालयांमध्ये निर्माण झाला आहे. हातमोज्यांचे उत्पादन करणारे मोजकेच उत्पादक राज्यात असल्यामुळे पुरवठ्यावर प्रचंड ताण येत आहे. मागणीप्रमाणे पुरवठ्याचे गणित कोसळल्यामुळे महापालिका, तसेच काही खासगी रुग्णालयांमध्येही हातमोज्यांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.
मुंबई महापालिका तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये गोरगरीब, तसेच गरजू रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी या रुग्णालयांमध्ये येतात असतात. मागील महिन्यापासून हातमोज्यांची उपलब्धता कमी जाणवू लागल्यामुळे रुग्णालयातूनच रुग्णांना ते बाहेरुन आणून देण्यासाठी सांगितले जाते. रुग्णांना शक्य नसते, तेव्हा डॉक्टर स्वतः पैसे घालूनही ते हातमोजे विकत घेत आहेत. राज्यात संक्रमण होणाऱ्या कोरोना काळामध्ये हातमोजे मुबलक उपलब्ध असणे अधिक गरजेचे आहे. मात्र, ते नसल्यामुळे रुग्णांची अडवणूक करता येत नाही. त्यांना वैद्यकीय उपचार त्वरित मिळायला हवेत, यासाठी डॉक्टरांनीही पदरमोड करण्याची तयारी ठेवली आहे.
वैद्यकीय परीक्षणासाठी वापरात येणाऱ्या हातमोज्यांची आयात ही मलेशियाहून करावी लागते. तर रबरचे हातमोजे केरळमधून मोठ्या प्रमाणात मागवण्यात येतात. करोना काळामध्ये हाताचा स्पर्श चेहऱ्याला होऊन, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. या प्रचारामुळे हातमोज्यांची मागणी या कालावधीमध्ये वाढली आहे. मलेशियासारख्या देशांकडे इतर देश अधिक किंमत देऊन हे उत्पादन विकत घेत असल्याने त्या देशांना प्राधान्य मिळत असल्याचे दिसून येते.
प्रतिक्रिया
हातमोज्यांचा शस्त्रक्रियेसाठी आणि वैद्यकीय निरीक्षणासाठी वापर करण्यात येतो. त्यात रबर आणि लेटेक्स असे दोन प्रकार येतात. नायट्रायल हातमोजे हे डॉक्टरांच्या हातामध्ये निळ्या रंगाचे असतात. शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणारे हातमोजे हे अधिक जाडीचे असतात. रबरचे हातमोजे केरळमधून मोठ्या प्रमाणात मागवण्यात येतात, तर वैद्यकीय परीक्षणासाठी वापरात येणाऱ्या हातमोज्यांची आयात ही मलेशियाहून करावी लागते. घाऊक बाजारात 100 रुपयांना 100 नग मिळायचे, हे दर आता 400 ते 450 रुपयांपर्यंत गेले आहेत, असे वैद्यकीय उत्पादनांच्या विक्री संघटनेचे प्रमुख अभय पांडे यांनी सांगितले आहे .
कोरोना काळात काही दिवसांपूर्वी हातमोज्यांचा तुटवडा होता. मात्र, आता तो पूर्ववत होत आहेत. ज्या रुग्णालयातून हातमोज्यांची मागणी आहे त्यांना त्या प्रमात पुरवठा केला जात आहे. या संदर्भात ज्या रुग्णालयाकडून अशा तक्रारी येत आहेत, त्यांच्याकडे विचारणा केली जाईल, असे पालिका रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे.