![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Mumbai Rain: दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला उधाण; किनाऱ्यावर क्लाऊड स्पीकर्सवरुन धोक्याच्या सूचना
Mumbai Rain: मुंबई उपनगर परिसरात सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसला होता. अवघ्या सहा तासांमध्ये तब्बल 300 मिलिमीटर पाऊस झाल्याने मुंबई उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते.
![Mumbai Rain: दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला उधाण; किनाऱ्यावर क्लाऊड स्पीकर्सवरुन धोक्याच्या सूचना Mumbai heavy Rain high tide in sea police stop people on gateway of India girgaon chowpatty Mumbai Rain: दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस, समुद्राला उधाण; किनाऱ्यावर क्लाऊड स्पीकर्सवरुन धोक्याच्या सूचना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/5a7ee6f378e62359fe0b35a7eceec62b1720432805680954_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: गेल्या काही तासांपासून मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. यानंतर आता दक्षिण मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही तासांपासून दक्षिण मुंबईत तुफान पाऊस (Mumbai Rain) सुरु आहे. अशातच दुपारच्या समुद्राला भरती (High tide in Sea) आल्याने उंच लाटा उसळत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
गेटवे ऑफ इंडिया येथे असलेल्या पर्यटकांना पोलिसांनी समुद्रापासून लांब केले आहे. समुद्राच्या बाजूने दोरखंड बांधून पर्यटकांना समुद्र जवळ येण्यापासून थांबवले जात आहे. तसेच क्लाऊड स्पीकरवरून सर्व पर्यटकांना समुद्रापासून दूर जाण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.
मुंबई उपनगर परिसरात सोमवारी पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसला होता. अवघ्या सहा तासांमध्ये तब्बल 300 मिलिमीटर पाऊस झाल्याने मुंबई उपनगरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. साकीनाका, असल्फा, हिंदमाता, जे.बी. नगर, विक्रोळी, भांडूप याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. पावसाचे पाणी रुळांवर साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक अत्यंत कुर्मगतीने सुरु आहे. मध्यंतरी पावसाचा जोर थोडासा ओसरल्याने सायन स्थानकातील पाणी ओसरले होते. मात्र, आता पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने मध्य रेल्वेच्या स्थानकांवर पाणी साचण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट
आज दुपारनंतर समुद्रामध्ये उंच लाटा उसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानंतर समुद्राला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळते. श्रीवर्धन समुद्रकिनारी असणाऱ्या भागात लाटा उसळलेल्या पाहायला मिळत आहेत. किनारपट्टी भागातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारी करणाऱ्या बांधवांना देखील समुद्रात जाण्यास सक्त मनाई असल्याने खबरदारीचा भाग म्हणून सावध राहायला सांगितले आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढला तर आणखी समुद्र खवळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट असल्याने अनेक भागात सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासन आणि आपत्ती विभागांकडून देण्यात आलेल्या आहेत.
काल रात्रीपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पाऊसाने अलिबाग तालुक्यातील मल्याण, बोरघर, रामराज, भिलजी इत्यादी गावातील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे कपडे, राशन इत्यादी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थ खूप भयभीत झालेत झाले होते. हे सर्व लक्षात घेऊन स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी तातडीने यंत्रणा कामाला लागल्या आहेत. गावात पावसामुळे झालेला नुकसानाचा पंचनामा करून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई भरून देण्याची हमी दिली आहे . त्यावेळी आमदार यांच्या पत्नी मानसी दळवी, यांनी देखील स्वतः घटनास्थळी जाऊन कुटुंबांना धीर दिला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)