Mumbai Rain Updates: मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी; सर्व यंत्रणा सज्ज, महानगरपालिका आयुक्तांची माहिती
Mumbai Rain Updates: आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे.
Mumbai Rain Updates मुंबई: हवामान खात्याने मुंबई महानगराला पावसाचा (Heavy Rain In Mumbai) रेड अलर्ट (Red Alert In Mumbai) जारी केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज (मंगळवार दिनांक 9 जुलै २०२४) रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने याबाबत घोषणा केली. आवश्यकता असेल, तरच घराबाहेर पडा, अशी सूचनाही प्रशासनाने नागरिकांना केली आहे.
भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना आज (मंगळवार दिनांक 9 जुलै 2024) रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडण्याचं आवाहन-
अति मुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) लक्षात घेता, नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्या सुचनांचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा मदत सेवा क्रमांक 1916 यावर संपर्क साधावा. भारतीय हवामान खात्याने मुंबईत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ही बाब लक्षात घेता, मुंबईकर नागरिकांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महानगरपालिकेने दिली.
🚨भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 8, 2024
The India Meteorological Department (IMD) has issued a 'Red Alert' for Mumbai.
🛑मुंबईकर नागरिकांनी आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे.
Mumbaikars, if not required, avoid stepping out of home.… pic.twitter.com/Q7gpqUYQM1
ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर
हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इ. 1 ली ते 12 वी च्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना दि. 09/07/2024 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील शाळाही राहणार बंद
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या मंगळवार दि. 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिला.
नवी मुंबईतील शाळांनाही सुट्टी-
अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेवून नवी मुंबई शहरातील सर्व शाळा सुट्टी देण्यात आली आल्याचे आयुक्त कैलाश शिंदे यांनी जाहीर केले आहे. सर्व माध्यमांच्या शाळा आज बंद राहणार आहेत.