तळोजा कारागृहात सुरूय पाण्याची विक्री? शहरी नक्षलवाद प्रकरणातील कैदी आंदोलनाच्या पवित्र्यात
Mumbai : मुंबईच्या तळोजा कारागृहात (Mumbai Taloja Jail) स्वच्छतेची वानवा आहे. कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या बॅरेकमध्ये घाणीचं साम्राज्य असल्यानं कैद्यांना त्वचेचे रोग झालेत. कैद्यांना माफक वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत, अशी तक्रार कैद्यांनी केलीय.
मुंबई : नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात (Mumbai Taloja Jail) कैद्यांना पुरेसं पाणी न देता त्याच पाण्याची विक्री सुरू असल्याचा आरोप केला जातोय. शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी सागर गोरखे याने याच कारणासाठी जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय. यासंदर्भात त्याने राज्याच्या गृहमंत्र्यांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलंय. कारागृहातील नियमावलीनुसार प्रत्येक कैद्याला दिवसाला 135 लिटर पाणी मिळायला हवं. मात्र, वास्तवात केवळ एक बादली म्हणजेच 15 लिटर पाणी दिलं जातं आणि त्यातच संपूर्ण दिवस काढायला भाग पाडलं जातं. पाण्याचा कोणताही तुटवडा नसताना हा सर्व प्रकार सुरू असून प्रत्येक कैद्याच्या वाट्याचं बाकीचं पाणी विकलं जात असल्याचा आरोप सागर गोरखे याने आपल्या पत्रातून केला आहे. या पत्राची एक प्रत मुंबई सत्र न्यायालय, महासंचालक कारागृह प्रशासन तसेच मानवाधिकार आयोगालाही पाठवण्यात आली आहे.
याशिवाय जेलमध्ये स्वच्छतेची वानवा आहे. कैद्यांना ठेवण्यात येणाऱ्या बॅरेकमध्ये घाणीचं साम्राज्य असल्यानं कैद्यांना त्वचेचे रोग झालेत. कैद्यांना माफक वैद्यकीय सुविधा दिल्या जात नाहीत. जुनाट पद्धतीमुळे कुटुंबियांना भेट घेण्यासाठी 5-6 तास वाट पाहावी लागते. दिवसाला जवळपास 500 नातलग दूरदूरहून कैद्यांना भेटण्यासाठी येतात, मात्र त्यांना वाट पाहण्यासाठी वेटिंग रूमची कोणतीही सोय नाही. नातलगांना पाठवण्यात येणारी पत्रं आधी स्कॅन करून तपासयंत्रणेकडे पाठवली जातात. तसेच त्यांच्याकडून येणारी पत्रं कुरीअर आधी तपासयंत्रणेंना दिली जातात. त्यानंतर त्यातील बरासचा मजकूर गायब करून ते दिलं जातं, अशा तक्रारींचा पाढाच या पत्रातून वाचण्यात आला आहे.
नवी मुंबईच्या तळोजा कारगृहात सागर गोरखेंसह शहरी नक्षलवादाच्या खटल्यातील अन्य आरोपी गौतम नवलखा, रमेश गायचोर, सुधीर ढवळे, महेश राऊत, सरूंद्र गडलिंग, आनंद तलेतुंबडे, हनी बाबू हे सर्व विविध आजारांनी त्रस्त असनू या सर्वांना उपचारांची गरज आहे. मात्र ती देण्यात जाणीवपर्वूक हयगय केली जात आहे. योग्य ते वैद्यकीय उपचार वेळेत न मिळाल्याने वयोवृद्ध कैदी स्वामी यांचा रूग्णालयात मृत्यू झाला. या सर्व परिस्थितीचा निषेध म्हणून 20 मे रोजी शहरी नक्षलवाद प्रकरणातील या सर्व कैद्यांनी कारागृहात एकदिवसीय उपोषण केलं होतं. मात्र सागर गोरखे याने माफक सुविधा पुरवल्या जात नाहीत तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय.