Corona Update : राज्यातील 12 जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
अद्यापही 24 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम आहे. ही कोरोनाची वाढ कमी करणे हे टार्गेट आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई : राज्यात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याचं दिसून येत आहे. या संदर्भात आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली की, मागच्या दोन आठवड्याशी तुलना केली तर राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र अद्यापही 24 जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या वाढ कायम आहे. ही कोरोनाची वाढ कमी करणे हे टार्गेट आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
टेस्टिंग कमी केलेली नाही
राज्यात कोरोना टेस्टिंग कमी केलेली नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. टेस्टिंग 2.50 लाखांपासून 2 लाख 80 हजारांपर्यंत कोरोना टेस्ट रोज केल्या जात आहेत. टेस्टिंगमध्ये RTPCR टेस्टची संख्या अधिक आहे. आपण 65 टक्के RTPCR टेस्ट करतो आहोत आणि अँटिजनची टक्केवारी 35 टक्के आहे. इतर काही राज्यांच्यामध्ये अँटिजन टेस्टची संख्या अधिक आहे.
राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये वाढ
टेस्टिंगमध्ये कुठेही घट न होता. कोरोनाची रुग्णवाढ, पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर, डिस्चार्स झालेल्या रुग्णांची कमी होत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 84.7 टक्के आहे तर देशाचा रिकव्हरी रेट हा 81 टक्के आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा देशापेक्षा जास्त आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ऑक्सिजनची मागणी झपाट्याने वाढ असताना ऑक्सिजनची गरज वाढली आहे. तसेच ऑक्सिजन ऑडिटच्या माध्यमातून ऑक्सिजन लीकेज थांबवणे गरजेचं आहे. सध्या आपण 40 हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची मागणी केली होती. पण आपल्याला 20 हजार कॉन्सट्रेटर उपलब्ध होतील. लस आणि रेमडेसिव्हीरसाठी ग्लोबल टेंडर काढलं आहे. राज्यात रेमडेसिव्हीर साडेतीन लाखांपर्यंत उपलब्ध होतील.
लसीकरणही लस उपलब्ध झाल्यावर वेगाने सुरु होत आहे. आज राज्यात 9 लाख लसीचे डोस आले आहेत. त्यामुळे 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांचं लसीकरण सुरु होईल. राज्यात सर्व ठिकाणी ते पाठवले जातील. 1 कोटी 65 लाख नागरिकांना आपण लस दिली आहे. हे सर्व नागरिक 45 वर्षांपेक्षा जास्त आहेत.