दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे राज्यात 41 आणि मराठवाड्यात आठ आमदार निवडून आले आहेत.
Maharashtra Assembly Election: राज्यातील विधानसभेत महायुतीच्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री भाजपचाच हे ठरलं असलं तरी आता महायुतीत अजित पवार गटातील मराठवाड्यातील आमदारांना कोणतं मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोट्यातून नवीन चेहऱ्याला संधी मिळणार का? विशेषतः नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक एक आमदार अजित पवार यांच्या गटाचा निवडून आला असून, या तिघांपैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याबाबत उत्सुकता आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे राज्यात 41 आणि मराठवाड्यात आठ आमदार निवडून आले आहेत. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीला 10 ते 12 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर अजित पवार आपल्या कोट्यातून कुणाला संधी देतात, याकडे नजरा लागल्या आहेत. दरम्यान,मराठवाड्यात विशेषतः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार तीन जिल्ह्यांत एक मंत्रिपद देऊ शकतात.
राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार बीडमध्ये
विधानसभेच्या निवडणुकीसाठी बीड मतदारसंघ महत्वाचा मानला जात होता. या जिल्ह्यात महायुतीचे सर्वाधिक तीन आमदार आहेत. यात धनंजय मुंडे (परळी), विजयसिंह पंडित (गेवराई), प्रकाश सोळंके (माजलगाव) नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर (लोहा),लातूर जिल्ह्यात संजय बनसोडे (उदगीर) व बाबासाहेब पाटील (अहमदपूर) असे एकूण 8 आमदार आहेत. परभणी जिल्ह्यात राजेश विटेकर (पाथरी) आणि हिंगोली जिल्ह्यात राजू ऊर्फ चंद्रकांत नवघरे (वसमत) आमदार आहेत. या आठ जणांपैकी किमान दोघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचा अंदाज बांधला जात आहे. यामध्ये बनसोडे आणि मुंडे हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात मराठवाड्यातून एका जुन्या अन् एका नवीन चेहऱ्याचा समावेश असू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे.
नांदेड, परभणी, हिंगोलीतून कोण?
भाजपमधून ऐनवेळी राष्ट्रवादीत आलेले प्रतापराव चिखलीकर हे मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत.दुसरीकडे परभणीतील पाथरीचे राजेश विटेकर आणि हिंगोली जिल्ह्यातून पुन्हा आमदार झालेल्या वसमतच्या राजू नवघरे यांचाही विचार केला जाऊ शकतो. त्यात युवा चेहरा आणि आजपर्यंत राष्ट्रवादीचे घड्याळ न सोडलेल्या राजू नवघरे यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता अधिक आहे.
राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार असून मुख्यमंत्रिपद भाजपकडे असणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव पुढे असताना काल रात्री (30 नोव्हेंबर) दिल्लीत पुन्हा राजकीय घडामोड घडल्याचे समोर आले आहे.