Nashik News : मुलांना मोबाइलपासून दूर करण्यासाठी अनोखा नंबर, अंनिसचे श्री स्वामी समर्थ केंद्रास आव्हान
Nashik News : मुलांचे मोबाईलचे व्यसन सोडविण्यासाठी हा अंक लिहावा, असं व्हिडिओत म्हटलं आहे.
Nashik News : मोबाईल (Mobile) सध्याच्या काळात जीवनावश्यक वस्तू झाल्याचे दिसून येत आहे. यात सर्वच वयोगटातील नागरिक मोबाईलच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. यात लहान मुलांचा देखील समावेश आहे. मात्र याच लहान मुलांचे मोबाईलचे व्यसन सोडवायचे असेल तर मुलांच्या कपड्यावर अंक लिहावा अशा आशयाचा विडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र हा दावा खोटा असून वैज्ञानिक कसोटीच्या आधारे हा दावा दहा दिवसात सिद्ध केल्यास 21 लाखांचे बक्षीस देऊ असे आव्हान नाशिक (Nashik) अंनिसने (Maharashtra Andhashradhha Nirmulan Samiti) केले आहे.
काही दिवसांपासून हा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओत मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलांना यातून सोडविण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक त्यांच्या क्रमांक त्यांच्या कपड्यावर एका विशिष्ट रंगात लिहल्यास त्यातून बाहेर पडता येईल असा उपायाचा व्हिडिओ आहे. अण्णासाहेब मोरे (Aannasaheb More) यांचा हा व्हिडीओ असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओच्या आधारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांना वैज्ञानिक उपायांच्या आधारे हा दावा दहा दिवसांच्या आत सिद्ध करून 21 लाख रुपये जिंकण्याचे आणि दावा सिद्ध करू शकत नसल्यास माघार घेत असल्याचे लेखी पत्र सादर करावे असे आव्हान अंनिसने दिले आहे.
अखिल भारतीय स्वामी समर्थ सेवा केंद्राचे आण्णासाहेब मोरे यांचा एका कार्यक्रमातील हा व्हिडीओ असून तो काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हिडिओत अण्णासाहेब मोरे हे कोणत्याही वयातील सज्ञान किंवा अज्ञान मुलांचा कपड्यावर संबंधित अंक एका विशिष्ट रंगात शाईच्या पेनाने लिहल्यास मुल मोबाईलच्या व्यसनापासून दूर होतील, असा त्यांनी दावा केला आहे. त्यावर शंका उपस्थित करत अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णां चांदगुडे यांनी दिंडोरी सेवा मार्ग केंद्रावर आव्हानचे पत्र पाठवले आहे. अंनिसच्या म्हणण्यासानुसा भारतीय राज्यघटनेतील श्रद्धा आणि उपासनेच्या स्वातंत्र्याचा महाराष्ट्र अंनिस आदर करते. शिवाय कोणत्याही व्यसनापासून मुक्ती मिळवण्यासाठी शास्त्रीय उपायांचा, उपचारांचा अवलंब उपकारक ठरतो ,असाही अंनिसचा ठाम विश्वास आहे. मात्र आपला हा अजब -अवैज्ञानिक दावा,लोकांना चमत्कारांवर विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करणारा आहे. अशा अवैज्ञानिक आणि लोकांची दिशाभूल, फसवणूक करणाऱ्या गोष्टींची जाहिरात आपण प्रसारमाध्यमांतून करीत असल्याचे अंनिसने पत्राद्वारे सांगितले आहे.
दहा दिवसांत उत्तर द्या : अंनिस
दरम्यान अंनिसने या व्हिडिओबाबत काही प्रश्न उपस्थित केले असून जर दावा सिद्ध केला तर 21 लाखाची रक्कम पारितोषिक म्हणून देण्यात येईल. जर वैज्ञानिक कसोट्यांच्या आधारे सदर दावा सिद्ध करू शकत नसाल तर, सदर दावा आम्ही सिद्ध करू शकत नाही त्यातून माघार घेतो, असेही लेखी पत्राद्वारे पुढील दहा दिवसात संघटनेला कळवावे, असे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले आहे.