Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू
महिलांची गर्दी आणि उष्णतेमुळे शांताबाई मोरे यांना त्रास होऊ लागला. अचानक त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या आणि त्या चक्कर येऊन खाली पडल्या.
![Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू Ladki Bahin Yojna Nanded News Women got Heart attack Maharashtra Marathi News Ladki Bahin Yojna: छातीत कळ आली अन् खाली कोसळल्या, मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात 'लाडक्या बहिणीचा' मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/14/40476ec60f8b0d4cee9a0d82950855c7172889414908589_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नांदेड : महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचं एक पाऊल म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने रविवारी (13 ऑक्टोबर) मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला आलेल्या एका 53 वर्षीय महिलेचा भोवळ येऊन मृत्यू झाला.
शांताबाई शिवाजी मोरे (53, रा. भनगी, ता.जि. नांदेड) असे मयत महिलेचे नाव आहे. मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमाला आलेल्या या लाडक्या बहिणीचा मृत्यू झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले.
नांदेड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर रविवारी मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत लाडक्या बहिणींचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. जिल्हाभरातून हजारो महिला या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. नांदेडपासून जवळच असलेल्या भनगी येथील 50 हून अधिक महिला या कार्यक्रमाला आल्या होत्या. यामध्ये शांताबाई मोरे यांचाही समावेश होता. मुख्यमंत्री दुपारी येणार असल्याने आयोजकांनी महिलांना सकाळी दहा वाजता कार्यक्रस्थळी बोलावले होते. परंतु प्रत्यक्षात कार्यक्रम तीन तास उशिराने म्हणजे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सुरू झाला.
उपचारादरम्यान शांताबाई मोरे यांचा मृत्यू
रविवारी प्रचंड उन्ह तापले होते. प्यायला पुरेसे पाणी देखील मिळाले नाही. महिलांची गर्दी आणि उष्णतेमुळे शांताबाई मोरे यांना त्रास होऊ लागला. अचानक त्यांच्या छातीत वेदना सुरू झाल्या आणि त्या चक्कर येऊन खाली पडल्या. यावेळी त्यांना तात्काळ मेळाव्याच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य पथकाला पाचारण करण्यात आले. शांताबाई यांच्यावर कार्यक्रमस्थळी असलेल्या डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारकामी विष्णुपुरी येथील शासकीय रूग्णालयात पाठविले. मात्र याठिकाणी उपचारादरम्यानच शांताबाई मोरे यांचा मृत्यू झाला.
महिलांना आत्तापर्यंत मिळाले 7500 रुपये
राज्यात या योजनेसाठी कोट्यवधी महिला पात्र ठरल्या आहेत. या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये पाठवण्यात आले होते. या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांनाही 1500 रुपये देण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यात काही महिलांच्या बँक खात्यात 4500 रुपये आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत. पात्र ठरलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण 7500 रुपये मिळाले आहेत.
हे ही वाचा :
लाडकी बहीणप्रमाणे ही लाडकी प्रवासी योजना, टोलमाफीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, म्हणाले, निवडणुकीपुरता नव्हे, पर्मनंट निर्णय!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)