Jyotiba Yatra : भाविकांची प्रतिक्षा संपली, जोतिबाचा मानाचा अश्व 'जय' अखेर डोंगरावर दाखल
Kolhapur : दख्खनचा राजा जोतिबाचा मानाच्या अश्वासाठी अनेक दिवसांपासून शोधमोहीम सुरू होती. ती आता संपली आहे.
कोल्हापूर: दख्खनचा राजा जोतिबाचा अश्व उन्मेश याचे निधन झाल्यानंतर नव्या अश्वासाठी सुरू केलेली शोध मोहीम अखेर संपली आहे. जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या तोंडावर जोतिबाचा मानाचा अश्व आज डोंगरावर दाखल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मानाच्या विश्वासाठी शोधमोहीम सुरू होती. 'जय'चे दर्शन घेण्यासाठी भाविक गेल्या महिन्याभरापासून प्रतीक्षेत आहेत.
कसा आहे जोतिबाचा अश्व?
पांढरा शुभ्र....उंचा पुरा... सडपातळ मान...मध्यम आकाराचे कान...पाणीदार डोळे...तुकतुकीत पातळ त्वचा...वय अवघं 14 महिने... जोतिबाचा मानाचा अश्व आज डोंगरावर दाखल झाला आहे. उन्मेश नावाच्या घोड्याचे निधन झाल्यावर आता 'जय' नावाचा घोडा जोतिबासाठी अर्पण केला आहे. सरकार घराण्यातील रणजितसिंह चव्हाण यांनी हा मानाचा घोडा जोतिबासाठी अर्पण केलाय. चव्हाण यांना हा अश्व मध्यप्रदेश या ठिकाणी मिळाला. चव्हाण यांच्या अनेक पिढ्या जोतिबाची सेवा करत आहेत.
जोतिबाच्या घोड्याचा शोध घेणं सोप काम नव्हतं कारण देवाला घोडा अर्पण करत असताना काही वैशिष्ट्ये असतात. तसाच घोडा देवाला अर्पण केला जातो.
जोतिबाच्या अश्वाची वैशिष्ट्ये काय असतात?
- घोडा आरोग्यदृष्ट्या तंदुरुस्त असावा लागतो.
- घोडा पूर्णत: पांढराशुभ्र असावा, शरीरावर कोठेही डाग दिसून चालत नाही.
- घोड्याच्या अंगावरचे केस ताठ उभे असावेत आणि डोळ्यातून अश्रूधारा येवू नये.
- पायावर आणि शरीरावर भौरा नाही, एकूण शरीरावर केवळ दोन भौरे.
- दागिने, तोफ आणि गर्दीची सवय लागते.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे घोड्यावर कुणीही बसलेले नसावे.
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची यात्रा या वर्षी पूर्ण क्षमतेने होणार आहे. 16 एप्रिलला जोतिबा चैत्र यात्रेचा मुख्य दिवस आहे. या वर्षी यात्रेसाठी भाविकांना कोणतेही निर्बंध नसणार आहे. त्यामुळे साधारणपणे 7 ते 8 लाख भाविक जोतिबा डोंगरावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: