Ladki Bahin Yojana : दीड हजार रुपयांसोबतच आता लाडक्या बहिणींना गॅस सिलिंडरही मोफत मिळणार; योजनेसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावानं असणं आवश्यक आहे.
![Ladki Bahin Yojana : दीड हजार रुपयांसोबतच आता लाडक्या बहिणींना गॅस सिलिंडरही मोफत मिळणार; योजनेसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक? Along with 1500 Rupees Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana Beneficiary will also get free gas cylinders under Mukhyamantri Annapurna Yojana What documents are required Ladki Bahin Yojana : दीड हजार रुपयांसोबतच आता लाडक्या बहिणींना गॅस सिलिंडरही मोफत मिळणार; योजनेसाठी कोणती कागदपत्रं आवश्यक?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/d023ed65791256c0fd1cd632033c84ec172010591835589_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Ladki Bahin Yojana 2024) राज्यभरातील महिलांना अर्ज करण्यासाठी मुदत वाढली आहे. आता 31 ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोफत गॅस सिलेंडर देणाऱ्या योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर, सर्वात महत्त्वाची अट म्हणजे, गॅस जोडणी महिलेच्या नावानं असणं आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेसोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावानं असणं आवश्यक आहे. एका कुटुंबात शिधपत्रिकेनुसार, केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असेल. तसेच, फक्त 14.2 किलोग्रॅम वजनाच्या सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस ग्राहकांना ही योजना लागू असेल.
या योजनेचा लाभ कसा घेता येणार?
केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचं नियमित वितरण तेल कंपन्यांकडून केलं जातं. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या 3 मोफत गॅस सिलेंडरचं वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासन 530 रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणार आहे.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 830 रुपये प्रति सिलेंडर थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या योजनेत ग्राहकांना एका महिन्याला एकापेक्षा जास्त सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही. 1 जुलै 2024 रोजी पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ देण्यात येईल. 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेला पात्र ठरणार नाही.
कोणती कागदपत्र आवश्यक?
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आणि लाभार्थी निवडीसाठी मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी एक, तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे शहरासाठी नियंत्रक, शिधावाटप आणि संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल, तर संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत असेल.
या दोन्ही समिती लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे (रेशन कार्डनुसार) कुटुंब निश्चित करेल. निकषांची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांची आधार प्रमाणित अंतिम यादी, आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित केले जाईल.
अर्ज भरण्याची मुदत आता 31 ऑगस्टपर्यंत
महाराष्ट्र सरकारनं 2024-25 चा आर्थिक अर्थसंकल्प सभागृहात सादर करताना राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024' जाहीर केली. त्याद्वारे राज्यातील महिलांना 18 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना दरमाहा आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गावागावंत महिलांनी मोठी गर्दी केली. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारनं लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)