Ajit Pawar : महायुतीतील जागावाटपावरुन अजित पवार नाराज? लोकसभेच्या नऊ, विधानसभेच्या 90 जागांच्या आश्वासनाचं काय झालं?
Maharashtra Mahayuti Seat Sharing : अमित शाहंसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार गटाला एक अंकी जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर अजित पवार गटातील अनेक नेते नाराज झाल्याची माहिती आहे.
Maharashtra Mahayuti Seat Sharing : राज्यातील महायुतीच्या जागावाटपामध्ये अजित पवार गटाला कमी जागा मिळणार असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काहीसा नाराजीचा सूर असल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी लढवण्यासाठी अपेक्षित असलेल्या जागा मिळत नसल्यामुळे राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे. महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपचा वरचष्मा ठरणार असल्याचं जवळपास निश्चित असून त्यासंबंधित दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
लोकसभेच्या नऊ आणि विधानसभेच्या 90 जागांचे आश्वासन
दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या घटक पक्षांची मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक पार पडली होती. या बैठकीपूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांची एक वेगळी बैठक पार पडली होती.
या बैठकीमध्ये महायुतीमध्ये येताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जे आश्वासन मिळालं होतं त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेच्या नऊ आणि विधानसभेच्या 90 जागा मिळाव्यात अशा प्रकारची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती.
अपेक्षित जागा मिळत नसल्याने अजित पवार नाराज?
मात्र अमित शहा यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला कमी जागा येत असल्यामुळे अजित पवार गट नाराज असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांना स्थानिक पातळीवरून नाराजी व्यक्त करणारे फोन येण्यास सुरुवात झाली होती.
कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुती जागा वाढवून मिळाव्यात अशा प्रकारची अपेक्षा कार्यकर्त्यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली होती. यामुळेच शुक्रवारी सकाळपासूनच महायुतीच्या बैठकीला जायचं की नाही याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये संभ्रम असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु सायंकाळी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीला एकत्रित रवाना झाले आहेत.
ही बातमी वाचा: