सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी
Maharashtra Guardian Ministers List : पालकमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे.

Maharashtra Guardian Ministers List : पालकमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना होण्याआधी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची वर्णी लागली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पालकमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम होता. कोणाला कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी मिळणार? याची सर्वत्र चर्चा सुरु होती. मात्र, अखेर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन महत्वाच्या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई शहर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे.
कोणाला कोणत्या जिल्ह्याची जबाबदारी?
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपद संजय शिरसाट यांच्याकडे देण्यात आलं आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचा कारभार देण्यात आला आहे. मुंबई उपनगराचे दोघांकडे पालकत्व देण्यात आले आहे. यामध्ये आशिष शेलार यांच्याकडे पालकमंत्रीपद तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री असणार आहेत. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना कोणतेही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नाही किंवा सह पालकमंत्री पद देखील नाही. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी गिरीश महाजन आणि दादा भुसे, माणिकराव कोकाटे या मंत्र्यांची नावे चर्चेत होती. पण गिरीश महाजन यांनी बाजी मारली आहे.
रायगडची जबाबदारी अदिती तटकरे यांच्याकडे
दरम्यान, अहमदनगरचे पालकमंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूरचे पालकमंत्रीपद जयकुमार गोरे यांच्याकडे, सांगलीचे चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे प्रकाश आबीटकर, साताऱ्याचे शंभूराज देसाई यांच्याकडे देण्यात आले आहे. दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठा संस्पेन्स होता. या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना देण्यात आले आहेत. या जिल्ह्यासाठी मंत्री भरत गोगावले हेदेखील इच्छुक होते. मात्र, अदिती तटकरे यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, जळगावची जबाबदारी गुलाबराव पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. तर रत्नागिरीची जबाबदारी उदय सामंत यांच्याकडे देण्यात आली आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गची जबाबदारी नितेश राणे यांच्याकडे देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Maharashtra Guardian Ministers List : पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर, बीड आणि पुण्याबाबत सरकारचा मोठा निर्णय; कोणत्या मंत्र्याकडे कोणता जिल्हा? संपूर्ण यादी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

