Amit Shah In Kolhapur : अमित शाहांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा; कोल्हापुरात 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्याची धरपकड
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जवळपास 800 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला.
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने सन 2022/23 मध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील तुटलेल्या ऊसाला 100 रुपयाचा तोडगा काढूनही गेल्या दहा महिन्यांपासून या प्रस्तावाला राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani Shetkari Aanghatana) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah In kolhapur) आज (25 सप्टेंबर) यांना कोल्हापूर दौऱ्यात काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्याचा इशारा दिला होता.
अमित शाह कोल्हापूरमध्ये येत असल्याने कोल्हापूर पोलिसांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जवळपास 800 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची धरपडक होत असल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली.
तर जशास तसे उत्तर देऊ
कार्यकर्त्यांना राज्य सरकारच्या दबावामुळे अटक करणार असाल, तर जशास तसे उत्तर देऊ, सरकारला एवढीच भीती असेल तर शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी पोलीस प्रमुखांच्या भेटीत केली. दरम्यान, स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांना वडगाव पोलीस ठाण्यामध्ये अटक करण्यात आली. कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्यात आलं आहे.
त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या 800 कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्यासंदर्भात नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. शेकडो कार्यकर्त्यांची आज पहाटेपासून धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री यांच्या दोऱ्यामध्ये स्वाभिमानीकडून कोणत्याही पद्धतीने अडथळा येऊ नये, यासाठी कोल्हापूर पोलिस अधिकच सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 2022-23 या गळीत हंगामातील तुटलेल्या ऊसास प्रतिटन 400 रूपयाचा दुसरा हप्ता मिळावा याकरिता पुणे बंगळूर महामार्ग रोखून आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने प्रतिटन 100 रूपयाचा तोडगा काढून आंदोलन स्थगित करण्यात आले होते. जवळपास 10 महिने झाले तरीही सरकारकडून सदर प्रस्तावांना मान्यता न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने 25 सप्टेंबर रोजी केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह व महाराष्ट्राचे राज्यपाल सी राधाकृष्णन यांच्या दौऱ्यात निदर्शने करून काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याचा इशारा दिला होता.
इतर महत्वाच्या बातम्या