Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Kolhapur News : स्वप्निलचा खून केल्यानंतरत त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याच्या चेहऱ्याचा दगडाने चेंदामेंदा केला होता. तसेच गाडीमधील पेट्रोल काढून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर : एक वर्षांपूर्वी चूलत बहिणीची छेड काढल्याच्या रागातून मित्राची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कौलगेमध्ये घडली. स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील (वय 30) असे या खून झालेल्या तरुणाचं नाव असून त्याचा मृतदेद अर्धवट जळालेल्या स्थितीत आढळून आला. खडकेवाडा हद्दीमध्ये त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर काही तासांमध्येच बहिणीची छेड काढ्याच्या रागातूनच हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले. अत्यंत क्रूर पद्धतीने हा खून करण्यात आला आहे.
पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपींचा माग काढला
पोलिसांनी आशुतोष उर्फ छोट्या चंद्रकांत पाटील (वय 25 रा. कौलगे) व सागर संभाजी चव्हाण (रा. नानीबाई चिखली) यांना अटक केली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार स्वप्निल हा एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होता. स्वप्निलच्या वडिलांनी 15 जानेवारीला स्वप्निल घरातून बाहेर पडला आला नसल्याने तक्रार दिली होती. त्यानंतर स्वप्निलचा मृतदेह खडकेवाडामध्ये पडला असल्याची माहिती मिळाली. मुलाचा खून झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपींचा माग काढला. मयत स्वप्नील पाटील आणि आरोपी आशुतोषचे गावामध्ये घर लागूनचे आहेत. स्वप्नील वर्षभरापूर्वी त्याच्या चुलत बहिणीची छेड काढली होती. त्यावेळी गावपातळीवर हे प्रकरण मिटवण्यात आले होते. मात्र, बहिणीची छेड काढल्याचा राग आशुतोषच्या डोक्यामध्ये होता. त्यामुळे 15 जानेवारीच्या रात्री स्वप्निल, आशुतोष आणि सागर चव्हाण एकत्र फिरत होते, अशी माहिती मिळाल्यानंतर खुनाचा उलघडा झाला.
अत्यंत निर्घृण पद्धतीने खून
स्वप्निलचा खून केल्यानंतरत त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याच्या चेहऱ्याचा दगडाने चेंदामेंदा केला होता. तसेच गाडीमधील पेट्रोल काढून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत राहिल्याने आरोपींचा भांडाफोड तत्काळ झाला.
इतर महत्वाच्या बातम्या