Kolhapur News : चंदगडमध्ये जेसीबी चालकाचा प्लॅन, तिघांना विमानानं बोलावलं अन् एटीएम फोडले; कोल्हापुरात राजस्थान टोळी जेरबंद, पहिल्याच गुन्ह्यात मुसक्या आवळल्या
जेसीबी चालक सलीम खान हा चंदगड तालुक्यात जेसीबीवर ड्रायव्हर असल्याने पंचक्रोशीची चांगलीच माहिती होती. यामधून कोवाडमधील एटीएम फोडीचा डाव त्याच्या डोक्यात घोळायला लागला होता.
Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील कोवाडमधील एसबीआय बँकेचं एटीएम फोडणाऱ्या राजस्थान टोळीला कोल्हापूर पोलिसांच्या एलसीबी पथकाने जेरबंद केलं आहे. 5 जानेवारीला कोवाडमधील एसबीआय बँकेचं एटीएम फोडून 18 लाख 77 हजारांची रोकड घेवून चोरट्यांनी पलायन केलं होतं. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतल्याने गतीने राजस्थानपर्यंत तपास करत पालघरमध्ये चोरट्यांना गजाआड केलं. दरम्यान, एटीएम लुटीतील रक्कम पोलिसांकडून हस्तगत करण्याची प्रकिया सुरू आहे.
जेसीबी ड्रायव्हरच्या डोक्यात लुटीचा प्लॅन
तस्लीम खान, अलिशेर खान, तालीम खान,अक्रम खान अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं आहेत. विशेष म्हणजे या चोरट्यांनी सोशल मीडीयावर एटीएम फोडण्याची माहिती घेतली होती. एटीएम फोडण्यासाठी मूळचा राजस्थान आणि सध्या चंदगडमध्ये राहणाऱ्या जेसीबी चालक सलीम खानने रेकी केल्याचे तपासात समोर आलं आहे. पालघरमधील अकबर खानने या चोरट्यांना मदत केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. जेसीबी चालक सलीम खान हा चंदगड तालुक्यात जेसीबीवर ड्रायव्हर असल्याने पंचक्रोशीची चांगलीच माहिती होती. यामधून कोवाडमधील एटीएम फोडीचा डाव त्याच्या डोक्यात घोळायला लागला होता. डोक्यात आयडिया येताच अन्य तिघांना बोलवून प्लॅन सांगितला होता. यानंतर सहकाऱ्यांनी दिल्ली ते मुंबई विमानाने प्रवास केला होता. यानंतर त्यांनी लुटीचा प्लॅन केला होता. विशेष म्हणजे चोरट्यांनी सोशल मिडीयावर एटीएम फोडण्याची माहिती घेतली होती.
4 जानेवारीच्या घटनेनं खळबळ
चंदगड तालुक्यातील कोवाडमध्ये गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून 18 लाख 77 हजार 300 रुपये लांबविल्याची घटना 4 जानेवारी रोजी कोवाडमधील स्टेट बँकेच्या शाखेत घडली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे नाकेबंदी करून नेसरीच्या चौकात चोरट्यांना अडविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, बॅरिकेड्स तोडून कारसह पोबारा केला. गॅसकटरद्वारे त्यांनी एटीएम फोडून रक्कम बाहेर काढलं होतं. हा प्रकार सुरू असताना ई-अलर्टमुळे हा प्रकार बँकेच्या मुख्य कार्यालयातून जिल्हा पोलिस विभागाला समजताच पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करताना नेसरी पोलिसांनी मुख्य चौकात नाकाबंदी केली. मात्र, भरधाव वेगात हेब्बाळच्या दिशेने पोबारा केला होता. हा थरार सुरु असतानाच कार पोलिसांच्या व्हॅनला धडकली होती. यामध्ये चोरट्यांच्या कारचा टायर व एअरबॅग फुटल्याने आपली कार हेब्बाळमध्येच सोडून रक्कम घेऊन पलायन केले होते.
पोलिसांनी एमएच 01, ईबी 9918 क्रमांकाची कार ताब्यात घेतली आहे. कोवाड, नेसरी, हेब्बाळमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असून त्याद्वारे पोलिसांची विविध पथके तयार करून तपास चालविला आहे. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बँकांनी एटीएम साठी सुरक्षारक्षक नेमावेत असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या