Kolhapur News : गतवर्षी तुटलेल्या ऊसाचे 200 रूपये प्रतिटन दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा; 'स्वाभिमानी'ची मागणी
कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे दर 4 हजार पेक्षा कमी आल्याने शासनाकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे करण्यात आली.
कोल्हापूर : राज्यातील चालू वर्षीचा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याअनुषंगाने गतवर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन 200 रूपये देण्याबाबत तातडीची कारखानदार व संघटना यांची बैठक लावण्याची व कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे दर 4 हजार पेक्षा कमी आल्याने शासनाकडून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे करण्यात आली.
200 रूपये प्रतिटन दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा
गतवर्षीच्या हंगामामध्ये साखर व उपपदार्थामध्ये साखर सरासरी 225 ते 275 रूपये , बगॅस प्रतिटन एक हजार रूपये व मळी प्रतिटन 2200 ते 2400 रूपयांपेक्षा जादा दर मिळाला आहे. वाढलेली महागाई, खताचे वाढलेले दर, साखर कारखानदार यांच्या इशाऱ्यावरून उसतोडणीसाठी साखर कारखान्याचे चिटबॅाय व मुकादम यांचेकडून होणारी शेतकऱ्यांची लूट यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे गतवर्षीच्या गळीत हंगामात तुटलेल्या उसाला 200 रूपये प्रतिटन दुसरा हप्ता दिवाळीपुर्वी शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणे गरजेचे असल्याचे स्वाभिमानीने म्हटले आहे. आचारसहिंता लागण्याआधी येत्या चार दिवसात प्रशासन, साखर कारखानदार व शेतकरी संघटनांची प्रतिनिधी यांची तातडीने बैठक घेऊन दुसऱ्या हप्त्याचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा यावर्षीच्या गळीत हंगाम सुरू होण्याआधी साखर कारखानदार व प्रशासनासोबत उस उत्पादक शेतकऱ्यांना टोकाचा संघर्ष करावा लागणार असल्याचे सांगितले.
सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी
सोयाबीनचा किमान हमीभाव 4900 रूपये असताना सध्या बाजारात 4 हजार पेक्षा कमी दराने सोयाबीनचा खरेदी सुरू आहे. ओलावा (मॅाईश्चर) असल्याचे कारण सांगून व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. यामुळे शासनाने कोल्हापूर जिल्ह्यात तातडीने सोयाबीन खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनाला देण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील , जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अजित पोवार, आप्पा एडके, बाळासाहेब पाटील, राजाराम देसाई, विक्रम पाटील, संपत पवार, तानाजी मगदूम, आण्णा मगदूम यांच्यासह स्वाभिमानीचे कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी ऊपस्थित होते.
ऊस परिषद 25 ॲाक्टोबरला जयसिंगपुरात
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चालू वर्षाच्या गळीत हंगामातील 23वी ऊस परिषद 25 ॲाक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रिडांगणावर होणार आहे. गत हंगामात तुटलेल्या उसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन दोनशे रूपये द्यावे आणि मगच कारखान्याची धुराडी पेटवा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या