बेळगावमध्ये मोठी दुर्घटना! मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू
सतत सुरू असलेल्या मुसळधार (rain update)झालेल्या पावसाने घराची भिंत कोसळून (Belgaum wall collapse) सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री बेळगाव जिल्ह्यातील बडाल अंकलगी येथे घडली.
बेळगाव : सतत सुरू असलेल्या मुसळधार झालेल्या पावसाने घराची भिंत कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री बेळगाव जिल्ह्यातील बडाल अंकलगी येथे घडली. एकाच घरातील सहा जणांचा आणि शेजारच्या घरातील एक अशा सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण गावावर शोकाकुल वातावरण पसरले आहे.
या घटनेत गंगव्वा खनगावी (वय 50), सत्त्यव्वा खनगावी, पूजा खनगावी, सविता खनगावी (28), लक्ष्मी खनगावी (15), अर्जुन खनगावी (45, काशव्वा कोळप्पंनावर, सर्व रा. बडाल अंकल्गी असे मयत झालेल्यांची नावे आहेत.
जोराच्या पावसाने अचानक घराची भिंत कोसळून एकाच घरातील सहा जण तर शेजारील घरातील आठ वर्षीय बालिका एकूण सात जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. या घटनेत घटनास्थळी पाच जणांचा मृत्यू झाला तर दोघांना गंभीर जखमी अवस्थेत बडाल अंकलगी येथील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन गेले असता तिथे त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती हिरे बागेवाडी पोलीस स्थानकात देण्यात आली. पोलीस स्थानकाचे सर्कल पोलीस निरीक्षक विजय सिंनुर घटनास्थळी आपल्या सहकाऱ्यांसह धाव घेऊन पाहणी केली. घटनेचा पंचनामा करण्यात आला. या घडलेल्या घटनेच्या मदतीसाठी अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या सहकार्याने मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व मृतांना बाहेर काढण्यात आले.मृतांवर मध्यरात्री सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.
खनगा वी कुटुंबीयांनी आपल्या घराच्या छताची दुरुस्ती करण्यासाठी छत काढले होते. त्यामुळे आपल्या घराच्या बाजूच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये ते राहत होते.परतीच्या पावसामुळे घराची भिंत कोसळली आणि सात जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. पाच जण जागेवरच ठार झाले तर दोघांचा उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला. मृतांपैकी एक मुलगी शेजारच्या घरातली होती. ती आपल्या मैत्रिणीकडे अभ्यास करण्यास आली होती.त्यावेळी भिंत कोसळल्याने तिचा मृत्यू झाला.
दुर्घटनेची माहिती कळताच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनीही त्वरित घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. पोलीस आणि अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मदतकार्य करून मृतदेह बाहेर काढले.