(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरातमध्ये भाजपकडून नेतृत्वबदलाचं शिस्तीत ऑपरेशन, पंजाबमध्ये काँग्रेसचा अंतर्गत थयथयाट सुरु
काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे दोन मुख्यमंत्री मागच्या एका आठवड्यात बदलले गेलेत. गुजरातमध्ये विजय रुपाणी यांना भाजपनं हटवलं आणि या शनिवारी काँग्रेसचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर यांची खुर्ची गेली.
नवी दिल्ली: पंजाबमध्ये काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षात अखेर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांची खुर्ची गेलीच. निवडणुकीला अवघे सहा महिने उरले असताना काँग्रेसमधला हा संघर्ष उफाळून आला..नवा मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता तर आहेच. पण यानिमित्तानं भाजप आणि काँग्रेसच्या कार्यशैलीतला फरकही ठळकपणे समोर येतोय.
काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे दोन मुख्यमंत्री मागच्या एका आठवड्यात बदलले गेलेत. मागच्या शनिवारी गुजरातमध्ये विजय रुपाणी यांना भाजपनं हटवलं आणि या शनिवारी काँग्रेसचे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर यांची खुर्ची गेली. पण दोन्ही ठिकाणी जी प्रतिक्रिया उमटली आणि पक्षानं ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळली त्यात मात्र बराच फरक आहे.
Punjab CM : नवज्योतसिंह सिद्धू की सुनिल जाखड? पंजाबचा नवा 'कॅप्टन' कोण?
गुजरातमध्ये विजय रुपाणी यांना भाजपनं रातोरात हटवलं. केवळ मुख्यमंत्रीच बदलला नाही तर अख्खं मंत्रिमंडळ घरी बसलं. पण कुठेही हूं की चू झालं नाही. तर दुसरीकडे पंजाबमधली स्थिती, काँग्रेस हायकमांडनं अमरिंदर यांना आमदारांची एक बैठक घ्यायला सांगितली, तर एवढा मोठा राजकीय भूकंप झाला.
CM Amarinder Singh Resigns: पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर यांना खुर्ची का गमवावी लागली?
रुपाणी यांनी सत्ताबदलानंतर चूपचाप हायकमांडचा आदेश मान्य केला. त्यांनीच काय कुठल्या मंत्र्यानंही साधा विरोधाचा शब्द काढला नाही. पण इकडे पंजाबमध्ये अमरिंदर यांची खुर्ची गेली आणि पुढच्या दोन तासांत ते मीडियावर येऊन आपल्याच नेत्यांवर बरसायला लागले..सिद्धुंना विरोध करताना तर त्यांनी पाकिस्तानच काढला.
दोन्ही राज्यांमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत. पंजाबमध्ये पुढच्या सहा महिन्यात तर गुजरातमध्ये पुढच्या सव्वा वर्षात. नेतृत्वबदल कदाचित दोन्ही पक्षाच्या हायकमांडला आवश्यक वाटत असेलही, पण तो करताना स्थितीवरची पकड मात्र दोन्ही ठिकाणची भिन्न.
पंजाबमध्ये गेल्या 24 तासांत काय घडलं
- अमरिंदर यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढच्या मुख्यमंत्र्याला अवघ्या सहा महिन्यांत निवडणुकांना सामोरं जायचंय
- त्यामुळे निवडणुकीपूर्वीच आश्वासक चेहरा काँग्रेस देणार की केवळ नाईट वॉचमन पाठवणार हा ही प्रश्न
- ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांना मुख्यमंत्री बनवायची काँग्रेस हायकमांडची इच्छा, पण त्यांनी ही जबाबदारी नाकारली
- हिंदू मुख्यमंत्री द्यायचा की शीख यावरही बरीच खलबतं सुरु आहेत
- सुखजिंदर रंधावा जे 3 वेळा आमदार राहिले आहेत त्यांचंही नाव सध्या समोर येतंय.
मोदी सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात जिथून असंतोषाची सुरुवात झाली ते राज्य म्हणजे पंजाब. त्यामुळे इथली राजकीय जमीन खरंतर काँग्रेसच्या फायद्याचीच होती. भाजप, अकाली दलाविरोधात इथे पूर्ण रोष. पण आता अंतर्गत भांडणात काँग्रेस पुन्हा सत्ता टिकवण्यात यशस्वी होते का याबद्दलच प्रश्न उपस्थित होऊ लागलेत.
देशात इन मीन तीन राज्यात काँग्रेसचे सध्या मुख्यमंत्री आहेत. पंजाब, राजस्थान आणि छत्तीसगड... आणि साम्य म्हणजे तीनही राज्यात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची पक्षातल्या भांडणामुळे अस्थिर आहे. त्यामुळे आता पंजाबपाठोपाठ राजस्थानात अशोक गहलोत यांच्याही खुर्चीला धक्के बसणार का? हे पाहावं लागेल.