(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Farmers Protest : शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम, दिल्ली मार्च तात्पुरते स्थगित; दलित प्रेरणा स्थळावर 3 हजार शेतकऱ्यांचा मुक्काम
Farmers Protest Delhi : दिल्लीमध्ये 6 डिसेंबरपासून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं असून विविध शेतकरी संघटना आपल्या मागण्याांसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
नवी दिल्ली : प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी सात दिवसांची मुदत मागितल्यानंतर आता शेतकऱ्यांनी त्यांच्या 'दिल्ली मार्च'ला तात्पुरती स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून या काळात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. पण या सात दिवसांच्या काळात आंदोलक शेतकरी हे दलित प्रेरणा स्थळी मक्कामी असतील अशी माहिती आहे. त्यामुळे आता दिल्ली-नोएडा सीमेवर लावलेले बॅरिकेड्स पोलिसांनी हटवले असून नोएडा-ग्रेटर नोएडा एक्सप्रेसवे आणि यमुना एक्सप्रेसवेवर वाहतूक सुरू झाली .
प्रशासनाने शेतकऱ्यांकडून सात दिवसांचा अवधी मागितला, तो शेतकऱ्यांनी दिला. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी राहण्याची, जेवणाची, झोपण्याची व्यवस्था करायला सुरुवात केली आहे. यापूर्वी,शेतकरी संघटनांच्या सदस्यांनी नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथून दिल्लीच्या दिशेने मोर्चा सुरू केल्यानंतर, दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे या ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था दिसून आली. तर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे दिल्ली-नोएडा सीमा ओलांडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय झाल्याचं दिसून आलं.
शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?
भारतीय किसान परिषदेचे (बीकेपी) नेते सुखबीर खलिफा यांनी रविवारी नवीन कृषी कायद्यांतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि फायदे मिळावेत या मागणीसाठी मोर्चाची घोषणा केली होती. त्याला किसान मजदूर मोर्चा (KMM), संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि इतर शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता 6 डिसेंबरपासून विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढण्यात येणार आहे. केरळ, उत्तराखंड आणि तामिळनाडूच्या शेतकरी संघटनाही त्याच दिवशी संबंधित विधानसभांच्या दिशेने प्रतिकात्मक मोर्चा काढणार आहेत.
सीमेवरच शेतकऱ्यांनी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था
डिसेंबरमध्ये असलेल्या कडक थंडीचा विचार करता शेतकऱ्यांची दलित प्रेरणा स्थळावर राहण्यासाठी आणि जेवणासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 2 ते 3 हजार शेतकऱ्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वाहतूक पुन्हा सुरू
शेतकऱ्यांचा दिल्लीकडे येणारा मोर्चा पाहता नोएडाच्या सर्व सीमा छावण्यांमध्ये बदल करण्यात आला होता. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी नोएडामध्येच 5000 हून अधिक पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. पोलिसांनी सर्व वाहनांना बॅरिकेड्स लावून त्यांची तपासणी सुरू केली. आता हा मोर्चा स्थगित झाल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास नोएडा-ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वे खुला करण्यात आला आणि बॅरिकेड्स हटवण्यात आले. त्यानंतर नोएडा ते दिल्ली या सर्व मार्गांवर लांबच लांब वाहतूक कोंडी दिसून आली.