60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक करून स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चेंबरमध्ये महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ लीक; युट्यूबरसह सांगली आणि लातूरमधील दोघांना बेड्या!
गुजरात पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रातून दोन आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी केल्यानंतर प्रयागराजचा यूट्यूबर चंद्रप्रकाश फूलचंदला अटक करण्यात आली आहे.

CCTV Cameras of 60-70 Hospitals Hacked : गुजरात पोलिसांनी शुक्रवारी प्रयागराज येथून एका यूट्यूबरसह 3 जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर महाकुंभात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ बनवून यूट्यूब आणि टेलिग्रामवर अपलोड केल्याचा आरोप आहे. या तिघांनी देशातील 60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केल्याचा पोलिसांना संशय आहे. हे लोक रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चेंबरमध्ये महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ लीक करत होते.
महिलांचे आक्षेपार्ह फुटेज आढळून आले
19 फेब्रुवारी रोजी राजकोटमधील पायल हॉस्पिटलमध्ये युट्यूबवर महिलांच्या चेकअपचे व्हिडिओ अपलोड करण्याचे प्रकरण समोर आले होते, गुजरात पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्रातून दोन आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी केल्यानंतर प्रयागराजचा यूट्यूबर चंद्रप्रकाश फूलचंदला अटक करण्यात आली आहे. चंद्रप्रकाशच्या चॅनलवर महाकुंभाचे 55 ते 60 व्हिडिओ अपलोड करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्रातील लातूर येथील प्रज्वल अशोक तेली आणि सांगली येथील प्राज राजेंद्र पाटील या दोघांना अटक करण्यात आली आहे.
महिलांच्या आंघोळीचे व्हिडिओ इतर चॅनललाही विकले
अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी सांगितले की, तपासात समोर आले आहे की, तिघांनी महाकुंभमध्ये महिलांच्या आंघोळीचे व्हिडिओ इतर चॅनललाही विकले होते. चंद्रप्रकाश फूलचंद स्वतः व्हिडिओ बनवत होता. तो त्याच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करून त्याची ऑनलाइन विक्री करायचा. आरोपीचे त्याच्या टेलिग्राम चॅनलवर 100 पेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत.
राजकोटच्या पायल हॉस्पिटलचे सीसीटीव्ही हॅक
पायल हॉस्पिटलचा सीसीटीव्ही फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये हॅक झाला होता. रूग्णालयातील महिलांच्या तपासणीचे व्हिडिओ बनवले गेले आणि ते विक्रीसाठी सोशल मीडिया साइटवर पोस्ट केले गेले. हे सर्व व्हिडिओ यूट्यूब आणि टेलिग्रामवर विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याप्रकरणी ही टोळी संशयित आहे. अहमदाबाद क्राइम ब्रँचने केलेल्या तपासात हे तीन आरोपी युट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवर महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ विकत असल्याचे समोर आले आहे. या मोबदल्यात मोठी रक्कम मिळवली. ही टेलिग्राम चॅनेल महाराष्ट्रात सांगली आणि लातूर येथून कार्यरत होती. या पथकाने महाराष्ट्र आणि प्रयागराजमध्ये तपास केला. या संपूर्ण तपासात 60 ते 70 वेगवेगळ्या रुग्णालयातील सीसीटीव्ही हॅक झाल्याचा संशय अहमदाबाद गुन्हे शाखेच्या पथकाला आहे. वर्षभरापासून हे रॅकेट सुरू होते. आता आरोपींना कोठडीत घेण्यात येणार आहे.
रोमानिया, अटलांटामधून रुग्णालयांचे सीसीटीव्ही हॅक
महाराष्ट्रातील प्रज्वल तेली हा मुख्य आरोपी आहे. तिन्ही आरोपींनी आठ महिन्यांत लाखो रुपये कमावले. आरोपी हे व्हिडीओ 800 ते 2000 रुपयांना विकत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रुग्णालयांचे आयपी पत्ते रोमानिया आणि अटलांटा येथून हॅक करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रज्वल रोमानिया आणि अटलांटा येथील हॅकर्सच्या संपर्कात होता.
महिलांच्या आंघोळीचे व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल
यूपीचे डीजीपी प्रशांत कुमार म्हणाले की, आंघोळ करताना महिलांचे व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी आतापर्यंत तीन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. अशा लोकांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. याशिवाय महाकुंभाबाबत दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी 55 ते 60 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही खाती चालवणाऱ्यांचा शोध घेण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

