(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Azadi Ka Amrit Mahotsav : सर्व ऐतिहासिक स्मारकांसह स्थळांवर 15 ऑगस्टपर्यंत मोफत प्रवेश, सांस्कृतिक मंत्रालयाचा निर्णय
देशात 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा केला जात आहे. यानिमित्त देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यानिमित्त सर्व ऐतिहासिक स्मारकांसह स्थळांवर 15 ऑगस्टपर्यंत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.
Azadi Ka Amrit Mahotsav : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर देशात 'आझादी का अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. यानिमित्त देशात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत (Ministry of Culture) येणाऱ्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तिकीट लागू असलेल्या सर्व ऐतिहासिक स्मारके आणि स्थळांवर 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत सर्व नागरिकांना मोफत प्रवेश देण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्रालयाने घेतला आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि सांस्कृतिक जागरुकता निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
स्वच्छता अभियानासाठी मुंबई मंडळाअंतर्गत असलेल्या 55 स्मारकांची निवड
दरम्यान, 2 ते 15 ऑगस्ट या काळात स्वच्छता अभियान राबवण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या मुंबई मंडळाअंतर्गत असलेल्या 55 केंद्रीय संरक्षित स्मारकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई विभागातील सर्व अकरा उप-मंडळ कार्यालये, मुंबई उपनगरीय, वसई, एलिफंटा, पुणे, जुन्नर, अलिबाग, जंजिरा, कोल्हापूर, विजयदुर्ग आणि सोलापूर येथील स्मारकांचा समावेश आहे. ऐतिहासिक स्मारके आणि वस्तूंच्या स्वच्छता मोहिमेत स्थानिक शाळा, महाविद्यालये आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले आहेत.
जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचे नियोजन
जल धरोहर अभियानाअंतर्गत, एएसआय पश्चिम महाराष्ट्रातील (कोकण प्रदेश) मध्यवर्ती संरक्षित 11 प्राचीन जलसंरचनांचे संवर्धन आणि पुनरुज्जीवनामध्ये सहभागी आहेत. या अभियानाअंतर्गत विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन या विषयावर माहितीची नोंद करुन त्याचे फलक तयार केले आहेत. त्याचे प्रदर्शन सोलापूरचा किल्ला, पायरीची विहीर, कराडमधील पंताचा कोट, अंबरनाथ मंदिर ठाणे येथील बावडी (विहीर), पाताळेश्वर लेणी पुणे येथील कुंड, महाबळेश्वर येथील कृष्णामाई मंदिरातील कुंड, मुंबईमधील मंडपेश्वर लेणी, जयगड किल्ल्यावरील बावडी (विहीर), जिजामाता वाड्यातील बावडी (विहीर), पाचड, तळा किल्ल्यावरचे टाके, कान्हेरी लेण्यांमधील टाकी आणि मुंबई येथील सायन किल्ल्यावरील तळे या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाद्वारे या जल कुंभांची स्वच्छता आणि जतन केले जात आहे. तसेच भविष्यात वापर करण्याच्या दृष्टीने या जल स्रोतांचे पुनरुज्जीवन करण्याचे नियोजन देखील आहे.
सर्व महत्त्वाच्या स्मारकांवर ध्वजारोहणाचे नियोजन
जल धरोहर अभियान हे अमृत सरोवर-जल धरोहर संरक्षण अभियानाचा भाग आहे. जल संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी भारत सरकारच्या शहर विकास मंत्रालयाद्वारे सुरु केलेली एक विशेष मोहीम आहे. हर-घर तिरंगा अभियाना अंतर्गत, एएसआयच्या सर्व महत्त्वाच्या स्मारकांवर ध्वजारोहणाचे नियोजन करण्यात आले आहे. विजयदुर्ग किल्ला, सोलापूर किल्ला, मुंबईमधील मंडपेश्वर लेणी, पालघर जिल्ह्यातील वसई किल्ला आणि पुणे येथील आगाखान पॅलेस या पाच ऐतिहासिक स्मारक स्थळांवर 15 मीटर उंच ध्वज स्तंभ उभारण्यात येत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा प्रमुख कार्यक्रम पुण्यामधील आगाखान पॅलेस येथे 15 ऑगस्ट रोजी (सकाळी 9 ते 11.45) आयोजित करण्यात आला आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्राध्यापक के. पद्दय्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ गांधीवादी प्रदीप मुनोत यांना गांधी स्मारक निधी, पुणेच्या इतर सदस्यांसह सन्माननीय अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या: