स्वातंत्र्यदिनी 'हर घर तिरंगा' लावाच, पण प्रत्येक गावात 75 झाडं लावा; सयाजी शिंदे आणि भालचंद्र नेमाडे यांचे आवाहन
Har Ghar Tiranga : अभिनेते सयाजी शिंदे आणि ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी राज्यातील सर्व गावांना 75 झाडं लावण्याचं आवाहन केलं आहे.
मुंबई: या स्वातंत्र्यदिनी 'हर घर तिरंगा' लावाच पण त्याचसोबत प्रत्येक गावात 75 झाडं लावा आणि ती वाढवा असं आवाहन अभिनेते सयाजी शिंदे आणि ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी राज्यातील सर्व गावांना केलं आहे. एबीपी माझासाठी त्यांनी एक विशेष व्हिडीओ तयार केला असून त्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे.
काय आवाहन केलंय?
अभिनेते सयाजी शिंदे आणि ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून राज्यातील सर्व गावांना आवाहन केलंय. ते म्हणतात, या स्वातंत्र्यदिनी 'हर घर तिरंगा' लावाच, पण त्याचसोबत गावातील 75 वर्षांवरील सर्व नागरिकांचा सत्कार करा आणि त्यांच्या नातवांच्या हस्ते गावात 75 झाडं लावा. या स्वातंत्र्यदिनाला तिरंग्याला आणि झाडांना सलाम करा आणि राष्ट्रगीत म्हणा.
ही झाडं लावा आणि ती वाढवा असं आवाहन अभिनेता सयाजी शिंदे आणि ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे.
13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा
यावर्षी आपण सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, त्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिमेला पाठबळ देऊया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा किंवा तुमच्या घरांमध्ये तिरंगा लावा. या मोहिमेमुळे आपले राष्ट्रीय ध्वजाशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होतील असेही मोदी म्हणाले.
शाळेतून मोफत तिरंगा वाटप
भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठीन राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी व्हावी, यासाठी ग्रामीण भागातील शाळांमधून मोफत तिरंगा वितरण केले जाणार आहेत. हे ध्वज प्राधान्याने जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात येईल. शाळामध्ये एकाच घरातील दोन आणि जास्त भावंड असल्यास दोघांना मिळून एकच तिरंगा वाटप करण्यात येईल. तसेच यानंतर जे ध्वज शिल्लक राहतील ते ध्वज गावातील आर्थिक दुर्बल नागरिकांना ग्रामपंचायतीमार्फत वितरीत करण्यात येईल.
पोस्ट ऑफिसमधून असा खरेदी करा तिरंगा
पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर www.epostoffice.gov.in भेट देऊन तुम्ही घरबसल्या तिरंगा खरेदी करु शकता. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर होम पेजवर तिरंगा दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी लॉग ईन केल्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर तसेच किती संख्येने तिरंगा पाहिजेत याची नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर ऑर्डर कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला पेमेंट प्रोसेस पूर्ण करावं लागेल. तुम्ही जर एकदा ऑर्डर केली तर तुम्हाला ती रद्द करता येणार नाही. पोस्टातून तिरंगा खरेदी करण्यासाठी तुम्हाला 25 रुपये खर्च करावे लागतील. पोस्ट ऑफिसने 1 ऑगस्टपासून तिरंगा विक्रीला सुरुवात केली आहे.