Pune Independence Day 2022 : पुण्यातील वारसा स्थळांवर 15 ऑगस्टपर्यंत प्रवेश विनामूल्य
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. त्याचंच औचित्य साधून पुण्यातील सगळ्या वारसा स्थळांवर विनामुल्य प्रवेश मिळणार आहे
Pune Independence Day 2022 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात साजरा केला जात आहे. त्याचंच औचित्य साधून पुण्यातील सगळ्या वारसा स्थळांवर विनामुल्य प्रवेश मिळणार आहे, असं भारतील पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. आजपासून (5 ऑगस्ट) 15 ऑगस्टपर्यंत पुढील दहा दिवस तिकीट न काढता प्रवेश मिळणार आहे. यासोबतच लोकसहभाग असलेले अनेक कार्यक्रम आणि योजना राबवण्यात येणार आहे. शनिवार वाडा, पाताळेश्वर लेणी, आगाखान पॅलेस, लोणावळ्यातील कार्ला-भाजा लेणी, लेण्याद्री, लोहगड आणि शिवनेरी या सगळ्या वारसा स्थळांवर विनामुल्य प्रवेश मिळणार आहे.
शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पुण्यातील अनेक वारसास्थळावर नागरीक आणि बाहेर गावाहून आलेले पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्याचबरोबर दरवर्षी स्वातंत्रदिन आणि प्रजासत्ताक दिनी शनिवार वाड्यावर गर्दी करतात. यंदा विनामुल्य प्रवेश असल्याने प्रचंड प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.
21 लाख 60 हजार घरांवर तिरंगा फडणार
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाबाबत पुणे जिल्ह्याचे नियोजन चांगले झाले 21 लाख 60 हजार घरांवर तिरंगा फडणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यामुळे शहरात अनेक ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. उपक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यास येथील कला, संस्कृतीला अधिक उजाळा मिळणार आहे. पुण्यातील अनेक ठिकाणी तिरंग्याची विक्री केंद्र असणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी या संदर्भात बैठक घेतली होती. यावेळी केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाअंतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.
भारत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याला 'आझादी का अमृत महोत्सव' असं नाव देण्यात आलं आहे. आझादी का अमृत महोत्सव हा भारत सरकारच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या लोकांचा, संस्कृतीचा आणि प्रगतीशील भारताच्या गौरवशाली इतिहासाचा गौरव करण्यासाठीचा एक उपक्रम आहे.