Agriculture Day Special: चार जिगरी दोस्तांच्या आयडियाची संकल्पना! चंद्रपूरात २५ वर्ष ओसाड असलेल्या जमिनीवर सुरु केलं कृषी पर्यटन केंंद्र; वर्षाला कमावतात 43 लाख रुपये
9 एकर जमिनीवर 2016 मध्ये हे कृषी पर्यटन केंद्र सुरु केलं. पहिल्यावर्षाचा टर्नओव्हर 4 लाखांचा होता मात्र या लॉकडाऊनंतर याच केंद्राचा टर्नओव्हर तब्बल 43 लाख रुपयांंचा आहे.
Ek Mokla Shwas Agro Tourism Park: नव्या पीढीला शेती आणि त्याबाबतची माहिती देणं गरजेचं आहे. गावाकडचं वातावरण, खेळ आणि ते अनुभव सध्याच्या तरुणांना किंवा शहरी नागरिकांना मिळावं यासाठी 'मोकळा श्वास' या नावानं आम्ही चार मित्र मिळून कृषी पर्यटन केंद्र सुरु केलं. चंद्रपूरसारख्या अति उष्ण भागात अनेकदा शेतीवर प्रयोग केले जात नाही आणि ताडोबा सोडलं तर पर्यटनासाठी फार काही उपलब्ध नाही त्यामुळे हा नवा प्रयोग आम्ही केला आणि आज तो यशस्वी होतोय, असं मोकळा श्वासचे सुहास आसेकर सांगत होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूऱ्याजळव 'एक मोकळा श्वास' हे कृषी पर्यटन केंद्र आहे. पर्यटनाची आवड आणि विविध क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असलेल्या चार जवळच्या मित्रांनी एकत्र येत 2016 मध्ये हा प्रयोग केला. चंद्रपूरातील अनेक भाग ओसाड आहेत. अनेक लोक कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र गावाची ओढ प्रत्येकाला आहे. त्यामुळे शेती , मातीशी नाळ जोडून रहावी आणि ग्रामीण संस्कृती जपता यावी, यासाठी या चार मित्रांनी पुढाकार घेतला.
25 वर्ष ओसाड पडलेली 9 एकर जमीन -
रिंकू मरसकोल्हे, सुहास आसेकर, नितिन मुसळे, रुपेश शिवणकर या चार मित्रांनी मिळून हा प्रयोग केला आहे. चारही मित्रांना पर्यटनाची प्रचंड आवड असल्याने प्रत्येकवेळी नव्या ठिकाणाला भेट देऊन काय नवं करता येईल याचा विचार केला. त्यावेळी चंद्रपूरसारख्या शहरात नवा प्रयोग यशस्वी होणार का?, कृषी पर्यटन लोक चंद्रपूरमध्ये का करतील ?असे अनेक प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर होते. कृषी पर्यटनासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे जमिन. यांच्यातल्या एकाकडे गेली 25 वर्ष ओसाड पडलेली 9 एकर जागा होती. त्या जागेवर 25 वर्ष शेती किंवा नांगर फिरला नव्हता. 9 एकर शेतजमिनीला जंगलाचं रुप आलं होतं. या जमिनीचा योग्य वापर करुन त्यांनी शहरात राहून गावात हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. झाडांच्या लागवडीपासून तर मशागतीपर्यंत या सगळ्यांनी मेहनत घेतली.
ग्रामीण संस्कृतीचं दर्शन अन् ग्रामीण पदार्थ -
मोकळा श्वास या कृषी पर्यटन केंद्रावर जाताच तुमचं हळद कुंकु लावून स्वागत केलं जातं. पाहूणचार केला जातो. त्यानंतर ग्रामीण रानमेवा, तर्री पोहे, पिठलं- भाकरी आणि त्यासोबत लहापणी शाळेत असताना खाल्लेले अनेक लहान मोठे पदार्थ उदा. बोरं, पेरु देतात. ग्रामीण भागात जे खेळ खेळले जातात. त्यापैकी अनेक खेळ या ठिकाणी खेळायला मिळतात. शेततळं, लगोरी, गोट्या, कंचे, रस्सी खेच, सायकल या सगळ्या खेळांचा अनुभव इथे आलेल्या प्रत्येक ग्राहकाला घेता येतो.
टर्नओव्हर किती?
9 एकर जमिनीवर 2016 मध्ये हे कृषी पर्यटन केंद्र सुरु केलं. पहिल्यावर्षी मक्याची शेती, इतर झाडांची लागवड, केंद्रासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विचार करता टर्नओव्हर 4 लाखांचा होता मात्र या लॉकडाऊनंतर याच केंद्राचा टर्नओव्हर तब्बल 43 लाख आहे.