Aurangabad: नायलॉन मांजाविरोधात औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई; आठ लाखांचा मांजा जप्त
Aurangabad : पोलिसांनी मोठ्या आकाराच्या 40 चकऱ्या आणि छोट्या आकाराच्या 120 चकऱ्या असा एकूण 7 लाख 98 हजार रुपयांचा मांजा जप्त केला.
Aurangagad Crime News: औरंगाबाद शहर (Aurangabad City) पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात मोठी कारवाई केली असून, तब्बल आठ लाखांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. नायलॉन मांजामुळे अपघात होऊन जीव जातो. कुटुंब उघड्यावर येते, असे मत व्यक्त करीत पोलिस, मनपा व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मांजाविरुद्ध मोहीम राबविण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench) दिले होते. त्यानंतर लगेचच शहर पोलिस कामाला लागले असून, कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 7 लाख 98 हजारांचा मांजा जप्त केला आहे. तर या प्रकरणी जिन्सी ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुश्ताक खान मुसा खान (वय 45 वर्षे, रा. नवाबपुरा), मनोहरलाल लोचवाणी (रा. सिंधी कॉलनी), मुज्जुभाई अशी आरोपींची नावे आहेत.
नायलॉन मांजासंबंधी खंडपीठात सुमोटो याचिका दाखल आहे. दरम्यान सुनावणीत नायलॉन मांजावरील कारवाईबाबात खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. सुनावणीला पोलिसांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. दरम्यान यावेळी पोलिसांनी 57 कारवाया केल्याचा आकडा सादर केल्यावर एवढ्या कारवाया तर एक दिवसात व्हायला पाहिजेत, असे न्यायालयाने सुनावले होते. तसेच नाराजी व्यक्त करत कारवाई करण्याचा सूचना केल्या होत्या.
पोलिसांची मोठीं कारवाई...
न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर लगेचच औरंगाबाद शहर पोलिसांनी कारवाईचा धडका लावला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने जुना मोंढा भागात छापा मारला. तर बालाजी लॉजिस्टिक्समध्ये नुकताच ट्रान्सपोर्टने येऊन पडलेला 22 बॉक्समधील नायलॉन मांजा पोलिसांनी जप्त केला आहे. यावेळी एकूण 7 लाख 98 हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे.
मोंढा भागात छापा मारल्यावर पोलिसांनी तेथील व्यवस्थापक मुश्ताक खानला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यावर त्याने मालक मनोहरलाल लोचवाणी याचे नाव सांगितले. त्यामुळे पोलिसांनी लोचवाणी याला ताब्यात घेताच त्याने चौकशीत हिना पतंग दुकानाचा मालक मुज्जूभाईचे नाव सांगितले. त्यामुळे पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल केला. त्यांच्या ताब्यातून मोठ्या आकाराच्या 40 चकऱ्या आणि छोट्या आकाराच्या 120 चकऱ्या असा एकूण 7 लाख 98 हजार रुपयांचा मांजा जप्त केला. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खंडपीठाचे निर्देश...
खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील बारा जिल्ह्यांमध्ये मनपा, स्थानिक स्वराज्य संस्थांनी नायलॉन मांजाविरोधात अभियान राबविण्याचे आदेश खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. संजय देशमुख यांनी दिले आहे. पोलिसांनी आपला लोगो असलेले पोस्टर्स महाविद्यालये आणि शाळांच्या परिसरात चिकटवावेत, त्यांद्वारे नायलॉन मांजा वापराचे दुष्परिणाम सांगावेत. जानेवारीपर्यंत नायलॉन मांजासंबंधी खंडपीठ सातत्याने सुनावणी घेईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.