Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळेंविरोधात अविश्वास ठराव, पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप, म्हणाले, ते पालकमंत्री होणार असल्यानेच...
Nashik Bajar Samiti : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

Nashik Bajar Samiti : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान सभापती देविदास पिंगळे (Devidas Pingle) यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. 18 पैकी 15 सदस्य विद्यमान सभापतींच्या विरोधात आले आहे. भाजपचे शिवाजी चुंभळे (Shivaji Chumble) यांनी देविदास पिंगळे यांना विरोध दर्शवला आहे. बाजार समितीच्या 15 सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पिंगळे यांच्या अविश्वास ठरावा संबंधी निवेदन दिले आहे. देविदास पिंगळे यांचा मनमानी कारभार असून त्याविरोधात संचालकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता पिंगळे यांचे सभापती पद धोक्यात आले आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती देविदास पिंगळे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे (NCP Ajit Pawar Faction) आहेत. नाशिक बाजार समितीवर असलेल्या एकूण 18 सदस्यांपैकी 15 सदस्यांनी विद्यमान सभापती देविदास पिंगळे यांच्याविरोधात अविश्वास दाखल केला आहे. विशेषः म्हणजे हे सदस्य पिंगळे यांच्यासोबतच निवडून आले आहेत. तर भाजपमध्ये (BJP) गेलेले माजी सभापती शिवाजी चुंभळे यांची ही खेळी असल्याचे बोलले जात आहे. चुंभळे यांनी संचालकांना आपल्याकडे वळवत पिंगळे यांच्यावर अविश्वास आणला आहे. यामुळे नाशिक बाजार समितीत भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
पिंगळेंचे गिरीश महाजनांवर गंभीर आरोप
नाशिक बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणल्याने पिंगळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री (Nashik Guardian Minister) होणार असल्याने त्यांनी यंत्रणा हातात घ्यायला सुरुवात केली आहे. पोलीस बंदोबस्तात बाजार समितीच्या संचालकांना जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले. प्रत्येक संचालकांना 50 लाख रुपये देऊन फोडले, यासर्व घडामोडी मागे गिरीश महाजन असल्याचा गंभीर आरोप देविदास पिंगळे यांनी केलाय. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेऊन याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती देखील देविदास पिंगळे यांनी दिली आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निमित्ताने महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























