Health: भारतात 50 वर्षांखालील पुरुषांना धोका, प्रायव्हेट पार्ट्सला होणाऱ्या 'या' कर्करोगाचं प्रमाण वाढतंय, 'ही' लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे धाव घ्या.
Men Health: पुरुषांनो.. सुरुवातीच्या टप्प्यावर हा कर्करोग ओळखणे खूप महत्वाचे आहे. त्याची लक्षणे काय आहेत? हा नेमका कोणता कर्करोग आहे? जाणून घ्या सर्वकाही
Men Health: पुरुषांनो... सध्या तुम्हाला स्वत:ची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, कारण भारतात प्रायव्हेट पार्ट्समध्ये होणाऱ्या एका कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. ज्याचा 50 वर्षांखालील पुरुषांना धोका निर्माण झाला आहे. तरुण वयात हा कर्करोग केवळ घातकच नाही तर जीवनावरही परिणाम करतोय. अशा परिस्थितीत, सुरुवातीच्या टप्प्यावर हा कर्करोग ओळखणे खूप महत्वाचे आहे. त्याची लक्षणे काय आहेत? हा नेमका कोणता कर्करोग आहे? जाणून घ्या सर्वकाही..
पुरुषांच्या खाजगी भागात होणारा एक जीवघेणा आजार
आम्ही ज्या कर्करोगाबद्दल सांगत आहोत, तो म्हणजे प्रोस्टेट कर्करोग... हा कर्करोग पुरुषांच्या खाजगी भागात होणारा एक जीवघेणा आजार आहे. हा कर्करोग प्रोस्टेट ग्रंथीमध्ये होतो. तसं पाहायला गेलं तर वृद्ध पुरुषांमध्ये त्याचा धोका जास्त असतो. पण अलीकडेच एक अहवाल समोर आला आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, भारतातील तरुण पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीचे डॉ. आशिष गुप्ता यांनी सांगितले की, 50 वर्षांखालील वयोगटात प्रोस्टेट कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.
2022 मध्ये भारतात तब्बल 37,948 कर्करोगाची प्रकरणं
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये भारतात 37,948 प्रोस्टेट कर्करोगाची प्रकरणे नोंदवली गेली. या वर्षी देशात नोंदलेल्या एकूण 14 लाख नवीन कर्करोगाच्या रुग्णांपैकी ही संख्या सुमारे तीन टक्के आहे. या कर्करोगाची लक्षणे प्राथमिक अवस्थेत आढळून आल्यास मृत्यूचा धोका खूप कमी होतो, असे डॉक्टर स्पष्ट करतात.
80 टक्के लोकांमध्ये याचं उशीरा निदान
प्रोस्टेट कर्करोगाचा शोध घेण्यास होणारा विलंब ही भारतातील मोठी समस्या आहे. डॉक्टर म्हणाले की, अमेरिकेत 80 टक्के प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांचे वेळेवर निदान होते, तर भारतात हा आकडा उलट आहे.
प्रोस्टेट कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे
- लघवी करण्यास त्रास होणे
- वारंवार लघवी होणे, विशेषत: रात्री
- मूत्र किंवा वीर्य मध्ये रक्त
- कूल्हे, पाठ किंवा ओटीपोटात वेदना
स्वतःचे रक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग
प्रोस्टेट कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही वेळा काही विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे टाळण्यासाठी, पुरुष नियमित प्रोस्टेट-विशिष्ट प्रतिजन (PSA) चाचण्या आणि परीक्षांद्वारे त्यांच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवू शकतात, तसेच रोग वाढण्याची शक्यता कमी करू शकतात.
हेही वाचा>>>
Men Health : पुरूषांनो आरोग्य सांभाळा.. प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतोय, कसा कराल बचाव? तज्ज्ञांकडून उपाय जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )